दादरच्या हॉकर्स प्लाझामध्ये बेकायदा गाळ्यांचे बांधकाम

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई महापालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवून दादरच्या हॉकर्स प्लाझामध्ये पाच गाळे एका रात्रीत बांधल्याचे उघडकीस आले आहे. माटुंग्यातील परप्रांतीय फेरीवाल्यांसाठी पालिकेच्याच मार्केट विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मध्यरात्री पाच गाळे बांधण्यात आले. अखेर हॉकर्स प्लाझामधील असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या गाळ्यांच्या वितरणास स्थगिती दिली आहे. कोट्यवधी रुपयांच्या किमतीच्या या गाळ्यांप्रकरणी मार्केट विभागाचे अधिकारी अडचणीत येणार आहेत.

दादरमधील फेरीवाल्यांसाठी पालिकेने 2000मध्ये  पाच मजल्यांचे हॉकर्स प्लाझा बांधले. यात 2100 गाळे  आहेत. आता या गाळ्यांना प्रचंड मागणी आली आहे. त्याचा फायदा घेऊन  ऑगस्ट महिन्यात हॉकर्स प्लाझाच्या तळमजल्यावर  दोनशे चौरस फुटांचे पाच बेकायदा  गाळे बांधण्यात  आले. माटुंग्यातील पाच प्रकल्पग्रस्तांसाठी हे गाळे बांधले.

न्यायालयाची स्थगिती

मध्यरात्री बारा ते पहाटे पाचच्या दरम्यान हे गाळे बांधण्यात आल्याचा हा प्रकार उघडकीस आल्यावर हॉकर्स प्लाझामधील व्यापारी संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. अभय ओक व न्या. छागला यांच्या खंडपीठाने या गाळ्यांच्या पुढील बांधकामास व गाळेधारकांना परवाने देण्यास स्थगिती दिली आहे.

 कोणाचा आशीर्वाद

माटुंग्यातील या पाच प्रकल्पग्रस्तांना हॉकर्स प्लाझामध्ये रातोरात गाळे बांधण्यामागे मार्केट विभागातील अधिकाऱ्याचा हात आहे असे सांगतात. 

नियम धाब्यावर; स्थायी समिती अंधारात

पालिका कायद्यानुसार कोणत्याही गाळ्यांच्या वितरणास स्थायी समितीच्या मंजुरीची आवश्यकता असते. गाळे वाटपाचे अधिकार पालिका आयुक्तांनाही नाहीत. पण स्थायी समितीला कोणताही प्रस्ताव सादर न करता मार्केट विभागाने   गाळे बांधण्याचा प्रस्ताव परस्पर तयार करून मंजुरीही देऊन टाकली. हॉकर्स प्लाझामधील गाळे फेरीवाल्यांसाठी बांधले आहेत. त्याचे वितरण प्रकल्पग्रस्तांना करता येत नाही. रस्तेरुंदीकरण किंवा अन्य प्रकल्पांत ज्यांची दुकाने किंवा गाळे गेले आहेत अशा प्रकल्पग्रस्तांसाठी पालिकेने स्वतंत्र मार्केट बांधली आहेत. त्याच मार्केटमधील गाळ्यांचे वितरण प्रकल्पग्रस्तांना करणे बंधनकारक आहे. पण माटुंग्यातल्या एफ-नॉर्थमधील या प्रकल्पग्रस्तांना हॉकर्स प्लाझामध्ये गाळ्यांचे वितरण करण्यात आले. प्रकल्पग्रस्तांना वाटप करताना पुढच्या वॉर्डमध्ये गाळ्यांचे वितरण करण्याचा नियम आहे. म्हणजे  माटुंग्यातील या प्रकल्पग्रस्तांना पुढच्या म्हणजे कुर्ला किंवा वांद्रे विभागात गाळे देणे आवश्यक होते. पण या प्रकल्पग्रस्तांवर दादरमधील मोक्याच्या हॉकर्स प्लाझामधील पाच गाळ्यांची खैरात करण्यात आली.