मूळ किमतीपेक्षा दुप्पट पैसे घेतले, ग्राहक न्यायालयाचा फ्लिपकार्टला दणका

एका सौंदर्यप्रसाधनाच्या मूळ किंमतीपेक्षा दुप्पट पैसे आकारणाऱ्या फ्लिपकार्ट या शॉपिंग वेबसाईटला ग्राहक न्यायालयाने दणका दिला आहे. बेंगळुरू येथील एका महिलेने फ्लिपकार्टविरुद्ध खटला दाखल केला होता. ग्राहक न्यायालयाने तिच्या बाजूने निर्णय देत फ्लिपकार्टला खडेबोल सुनावले आहेत आणि तिला 20 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत.

सौम्या पी. असं या महिलेचं नाव आहे. गुगलवर दिसणाऱ्या जाहिरातींनी प्रभावित झालेल्या सौम्या यांनी 191 रुपयांना फ्लिपकार्टवरून पतंजलीचं हेअर क्लिंजर मागवलं होतं. 10 ऑक्टोबर 2019 रोजी त्यांना त्याची डिलीव्हरी मिळाली. त्यानंतर सौम्या यांना उत्पादनाची किंमत 95 रुपये असल्याचं दिसलं. हे पाहून धक्का बसलेल्या सौम्या यांनी फ्लिपकार्टची शॉपिंग लिस्ट तपासली.

त्यात हेच उत्पादन 140 रुपयांना दिल्याचं आढळलं. त्याच्या शिपिंगचे 99 रुपये अधिक आकारण्यात आले होते. त्यामुळे त्याची किंमत सुमारे 191 रुपयांपर्यंत गेली होती. म्हणजेच कमाल विक्री किंमत (एमआरपी) पेक्षा ही किंमत वेगळी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी फ्लिपकार्टविरोधात ग्राहक न्यायालयात धाव घेतली.

त्या खटल्याच्या सुनावणीवेळी फ्लिपकार्टला एमआरपीच्या वर उत्पादनाची विक्री आणि अयोग्य व्यापार या दोन गुन्ह्यांसाठी दोषी मानण्यात आलं. त्यामुळे सौम्या यांना 96 रुपये मूळ किंमत, त्यावर घेतलेली रक्कम, सेवेत चूक झाल्याप्रकरणी 10 हजार रुपये भरपाई, अयोग्य व्यापारासाठी 5 हजार रुपये अतिरिक्त दंड तसंच, सौम्या यांना न्यायालयीन खटल्यासाठी आलेल्या खर्चाची भरपाई म्हणून 5 हजार अशी सुमारे 20 हजार रुपये नुकसान भरपाई न्यायालयाने ठोठावली आहे.