माजिवाडा उड्डाणपुलावर कंटेनर उलटला, वाहतुकीचा खोळंबा

93
फाईल फोटो

ठाणे–कंटेनर उलटल्यामुळे माजिवाडा उड्डाणपुल सात तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने ठाणेकरांना सकाळी आज प्रचंड ट्रॅफीकजामचा सामना करावा लागला. ऐन गर्दीच्या वेळी उड्डाणपुलावरची वाहतूक वळवल्यामुळे त्याचा ताण घोडबंदर मार्गावर पडला व तब्बल पाच तास वाहनांना वाहतूक कोंडीत अडवून रहावे लागले. याचा फटका स्कूल बसपासून मुंबई, नाशिककडे जाणाऱ्या वाहनांनाही बसला.

गुजरातहून जेनपीटीकडे जाणारा कंटेनर कापूरबावडी उड्डाणपुलावर पलटल्याची घटना शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. या अपघातात कंटेनर चालक सुरेश कुमार सतेरा याच्या डोक्याला दुखापत झाली असून त्याला उपाारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आहे. पहाटे पलटलेला कंटेनर दुपारी अकरा वाजता दोन क्रेनच्या सहाय्याने हटवण्यात वाहतूक पोलीस व महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला यश आले. कंटेनर हटवेपर्यंत मााजिवाडा उड्डाणपुलावरची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवून वाहने मुख्यरस्त्यावरुन वळवण्यात आली. त्याचा परिणाम वाहतूकीवर होऊन घोडबंदरसह ठिकठिकाणी ट्रॅफीक जामचा सामान वाहनचालकांना करावा लागला.

मुंबई-गुजराथला जोडणाऱ्या घोडबंदर मार्गावर सकाळी सहा वाजल्यापासूच वाहनांची वर्दळ सुरु होते. यामध्ये विशेषतः स्कूलबस, रिक्षांचा समावेश सर्वाधिक आहे. मात्र वाहतूककोंडीमुळे स्कूलबसेसना शाळा गाठण्यासाठी अर्धा ते पाऊणतास उशीर झाला. सकाळी नऊ नंतर या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या मार्गावर वाहतूक धिमी झाल्यामुळे त्याचा फटका शहरातील इतर रस्त्याच्या वाहतुकीवरही पडला. पातलीपाडा पासून ते भिवंडी-नाशिक बायपास रस्ता तसेच कोलशेत, वसंतविहार, ब्रम्हांड, गायमुख, बाळकुम इत्यादी ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. सकाळी अकराच्या सुमारास कंटेनर हटवल्यानंतर माजिवाडा उड्डाणपुल वाहतुकीसाठी पुन्हा सुरु झाल्यानंतर दुपारनंतर वाहतूक सुरुळीत झाली.

मोठा अनर्थ टळला

चालकाचा ताबा सुटल्यामुळे कंटेनर उड्डाणपुलाच्या कठडयावर आदळला. सुदैवाने कठडा तोडून कंटेनर उड्डाणपुलाच्या खाली कोसळला नाही. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

आपली प्रतिक्रिया द्या