ठेकेदारावर गुन्हा; अधिकारी रडारवर


सामना ऑनलाईन । नवी मुंबई

वाशी येथील सेक्टर 10 ए मध्ये पूल कोसळल्याची दुर्घटना घडल्याप्रकरणी पुलाची दुरुस्ती करणाऱया ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी या पुलाची पाहणी केल्यानंतर या कारवाईचे आदेश दिले. ठेकेदारापाठोपाठ याप्रकरणी निष्काळजीपणा करणाऱया अधिकाऱयांवरही आयुक्तांनी कारवाईचे निर्देश दिल्याने क्षेत्रीय अभियंत्यासह काही कर्मचारी रडारवर आले आहेत.

मिनी सीशोअर आणि सागर विहारला जोडणारा पूल गुरुवारी रात्री कोसळून सर्वेश पाल आणि जितेंद्र पाल हे गंभीर जखमी झाले होते. सुदैवाने त्यावेळी पुलावर गर्दी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली होती. या दुर्घटनाग्रस्त पुलाला महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी आज भेट दिली. त्यावेळी त्यांच्या समवेत अतिरिक्त महापालिका आयुक्त रवींद्र पाटील आणि शहर अभियंता सुरेंद्र पाटील हेही होते. या घटनेचा आढावा घेतल्यानंतर आयुक्तांनी या पुलाच्या दुरुस्तीचे काम करणाऱया ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार श्रीनिवास इंजिनीयरिंग या ठेकेदार कंपनी विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खबरदारी घेणे आवश्यक होते
या पूल 1999 मध्ये बांधण्यात आला आहे. त्याच्या दुरुस्तीचा ठेका आता देण्यात आला होता. त्यानुसार ठेकेदाराने 8 मार्च रोजी कामही सुरू केले आहे. हे काम करताना ठेकेदाराने आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक होते. पूल जर वाहतुकीसाठी बंद झाला असता तर ही दुर्घटना घडली नसती. त्यामुळे ठेकेदारावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत, अशी प्रतिक्रिया महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी व्यक्त केली आहे.