कल्याण-डोंबिवली महापालिकेतील धक्कादायक प्रकार, अभियंत्याच्या दालनातून ठेकेदाराने फाईल चोरली


सामना प्रतिनिधी, कल्याण

उल्हासनगर महापालिकेतून भाजप नगरसेवक प्रदीप रामचंदानी याने फाईल चोरल्याची घटना घडली असतानाच आता कल्याण-डोंबिवली महापालिकेतही फायलींना पाय फुटू लागले आहेत. शहर अभियंत्याच्या दालनातूनच ठेकेदाराने फाईल चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी आयुक्तांनी संबंधित ठेकेदारविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश अधिकाऱयांना दिले आहेत. फाईल चोरीच्या या प्रकारामुळे केडीएमसीमधील अधिकारी व कर्मचाऱयांमध्ये खळबळ उडाली आहे.

शिवसेना नगरसेविका ऊर्मिला गोसावी यांच्या नांदिवली प्रभाग 106 साठी शासनाने दलित वस्ती सुधार योजनेतून 20 लाखांचा निधी मंजूर केला होता. यातून पायवाट, गटार अशी कामे होणार होती. यासाठी प्रशासनाने या विकासकामाची फाईल तयार केली. या कामाचे टेंडरही निघाले. फक्त वर्प ऑर्डर निघणे बाकी होते. मात्र महिनाभरापासून ही प्रक्रिया होत नसल्याने आज ऊर्मिला गोसावी यांनी शहर अभियंता सपना कोळी – देवपल्ली यांची भेट घेऊन काम मार्गी लागत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. कोळी यांनी तुमची फाईल मिळत नसल्याचे सांगून फाईल शोधणे माझे काम नाही असे बेजबाबदार उत्तर दिले. यानंतर गोसावी आयुक्तांकडे याबाबतची तक्रार करण्यास जात असतानाच एका ठेकेदाराने माझ्याकडे फाईल असल्याचा पह्न करून पैशांची मागणी केली. हा प्रकार गोसावी यांनी आयुक्त गोविंद बोडके यांना सांगितल्यानंतर आयुक्तांनी कार्यकारी अभियंता रघुवीर शेळके यांना ठेकेदार अनंता ऊर्फ पिंटय़ा पगारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

पैसे द्या फाईल घेऊन जा
पालिकेत काही नगरसेवक ‘रिंग’ करून ठेकेदारांना कामे देतात. मध्यस्थी करून दलालीचा मलिदा लाटतात. अनंता पगारे या ठेकेदारानेही फाईल क्रमांक 2574 माझ्याकडे सुरक्षित आहे. एका नगरसेवकाला पैसे दिल्याशिवाय तुमची फाईल मिळणार नाही असे धमकावले. आता या प्रकरणाची गंभीर दखल आयुक्तंनी घेतली आहे.

भाजप नगरसेविकेला हुंदका आवरेना
एकीकडे फाईल चोरीचे प्रकरण दिवसभर पालिका वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेला असतानाच आमच्या फाईल मंजूर होत नसल्याचे गाऱहाणे घेऊन भाजप नगरसेविका वैशाली पाटील आयुक्तांच्या केबिनमध्ये धडकल्या. विकासकामाची एक फाईल तीन वर्षे मंजूर होत नाही. अधिकारी नाहक त्रुटी काढत आहेत, असे म्हणत वैशाली पाटील आयुक्तांसमोरच ढसाढसा रडल्या. यामुळे आयुक्त गोविंद बोडकेही गांगारून गेले. काम मंजूर होईल असे म्हणत त्यांनी कशीबशी पाटील यांची समजूत काढली आणि स्वत:ची सुटका करून घेतली.