मुंबईत स्फोट होणार; पण काळजीचं कारण नाही

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईमध्ये स्फोट करण्यात येणार असून त्याची कल्पना आधीच देण्यात आली आहे. घाबरू नका ही दहशतवाद्यांची धमकी नसून ही मेट्रोसाठीच्या कामासाठीची पूर्वतयारी आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झला जोडणाऱ्या मेट्रो-३ साठीच्या कामाला सुरूवात झाली आहे. ही भुयारी मेट्रो असल्याने जमिनीखाली त्यासाठीचं काम देखील सुरू झालं आहे. या कामासाठीच काही ठिकाणी नियंत्रित स्फोटांचा वापर करण्यात येणार आहे.

हे स्फोट घडवून आणण्याची परवानगी मिळावी म्हणून कंत्राटदारांनी स्फोटकांच्या वापरासाठीच्या विभागाशी संपर्क साधला आहे. भुयारी मेट्रोसाठी बोगदे तयार करण्यासाठी भलीमोठी अवजारं, यंत्रं आणण्यात आली आहे. मात्र काही ठिकाणी या यंत्रांऐवजी स्फोटकांचा वापर केल्यास काम लवकर होणार आहे. त्यामुळेच यासाठी एम.एम.आर.डी.ए प्रयत्नशील आहे. हे स्फोट किती ठिकाणी करण्यात येतील हे आत्ता सांगणं अवघड आहे मात्र बोगदे तयार करण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात झाल्यानंतर याचा अंदाज येऊ शकेल असं एम.एम.आर.डी.ए.तर्फे सांगण्यात येत आहे. हे स्फोट अत्यंत सुरक्षित पद्धतीने आणि पोलिसांच्या देखरेखीखालीच करण्यात येणार असल्याने नागरिकांना घाबरण्याचं काहीही कारणं नसल्याचं मुंबई महानगर विकास प्राधिकरणातर्फे सांगण्यात आलं आहे.