धर्मांतर : सत्ताप्राप्तीचे महत्त्वाचे हत्यार

1

>>मुजफ्फर हुसेन 

धर्मांतर हे सत्ताप्राप्तीचे एक महत्त्वाचे हत्यार ठरले आहे. लोकशाही असलेल्या देशात तर धर्माच्या प्रसारस्वातंत्र्याच्या नावाखाली पाहिजे तो गोंधळ घालता येतो. धर्माची सेवा म्हणून धर्मांतर घडवा, धर्मांतरातून लोकसंख्या वाढवा, वाढती लोकसंख्या ही आपली वोटबँक म्हणून वापरा आणि वोटबँकेच्या आधारावर त्या देशाची सत्ता आपल्या ताब्यात घ्या. सत्ता मिळाली की पुन्हा सत्तेचा वापर करून आपला धर्म त्या देशाच्या जनतेवर लादा ही एक साखळीच सुरू होते.

कुणी मानो अथवा न मानो, २०५० मध्ये म्हणजेच फक्त ३३ वर्षानंतर हिंदुस्तानची जी जनगणना होईल ती अतिशय आश्चर्यकारक असेल. वास्तवात लोकसंख्या वाढ होणे ही काही नवीन गोष्ट नाही. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण हे वैज्ञानिक प्रगती हेच आहे. वेगवेगळ्या कारणांनी पूर्वी लोकसंख्या घटत असे. मात्र आता वैज्ञानिक आणि वैद्यकीय प्रगतीमुळे ही कारणेच बहुतांश नष्ट झाली आहेत.

कधी अतिशय भीषण दुष्काळ पडत असे, कधी असे रोग पसरत की त्यात लाखो लोकांचे बळी जात. त्यातल्या त्यात लहान मुलांचे मृत्यूचे प्रमाण अधिक असे. देवी किंवा त्यासारखे अनेक आजार व त्यातून येणारे ताप यामुळे असंख्य मुलांचा मृत्यू होई. दुष्काळ आणि अतिवृष्टीतही लहान लहान मुलांचे मृत्यू होत असत. मृत्यूचे प्रमाण एवढे प्रचंड प्रामाणात वाढत असे की त्याची माहिती टक्केवारीच्या प्रमाणात सांगावी लागत असे. काही आजारात मुलांच्या आणि महिलांच्या मृत्यूचे आकडे फारच जास्त असे.

विसाव्या शतकाच्या प्रारंभी लोकांना शिक्षणाचे महत्त्व कळू लागले. शिक्षण वाढत गेले त्याचबरोबर लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकताही वाढत गेली. लोकांमध्ये स्वच्छता आणि शुद्धतेची जाणीव जशीजशी विकसित होत गेली आजारचे प्रमाण घटत गेले. आज असे अनेक आजार आहेत ज्यांचे पृथ्वीतलावरून अस्तित्वच नाहीसे झालेले आहे. युनेस्कोच्या जागतिक आरोग्य संघटनांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांनी अशा आजारांबाबत जाहीर घोषणाही केल्या आहेत.

उष्ण कटीबंध आणि विषुववृत्तीय प्रदेशात लोकसंख्या नेहमीच अधिक असते. याही देशात आरोग्यविषयक जागरूकता आणि सुविधा वाढल्या व आजार कमी होत गेले. जनतेचे आरोग्य ही आपली महत्त्वाची जवाबदारी आहे असे सरकारला वाटू लागल्याने सरकारतर्फे आरोग्याच्या सुविधांसाठी मोठय़ा प्रमाणात प्रयत्न केले जाऊ लागले. रस्ते होत गेले, स्वच्छता वाढली, पिण्याचे पाणी शुद्ध होत गेले तसे बालमृत्यूचे प्रमाण घटत गेले. विज्ञानामुळे अन्न, पाणी उपलब्ध होण्याचे प्रमाण वाढले. आर्थिक उन्नतीमुळे मानवी जीवनस्तर सुधारला. दळणवळणाची साधने वाढल्याने माणसाच्या कामकाजाच्या जागांचा परीघ वाढला. तो आता कामासाठी अधिकाधिक दूरपर्यंत जाऊ शकतो.

त्यातूनच शहरीकरण वाढले. महिलांना घरच्या घरी काम करण्याची, त्याच बरोबर शहरात जाऊन काम करण्याची प्रेरणा मिळत गेली. स्वच्छ पाणी, शुध्द हवा यासोबतच मोठी घरे आणि छोटे कुटुंब अशी स्थिती निर्माण झाली. परिणामी संयुक्त परिवारही कमी होत गेला. आज अपवाद वगळता जगभरातून अनेक आजार नामशेष झाले आहेत. जागतिक पातळीवर गेल्या शतकात आरोग्याच्या बाबतीत वाढलेल्या जागरुकतेमुळे सामान्य जनतेला आता आरोग्य हा आपला कायदेशीर अधिकार आहे हे लक्षात आले आणि तो मिळवण्यासाठी लोकांमध्ये सरकारशी लढण्याची वृत्ती निर्माण होत गेली. या क्रांतिकारक परिवर्तनामुळे मानवी जीवन अधिकच वाढले.

असे असले तरी आशिया आणि आफ्रिकेसारखे देश आरोग्याच्या बाबतीत मागासच आहेत. उष्ण कटिबंधीय आणि विषुववृत्तीय देशांमध्ये आजही आजाराच्या साथी ज्या वेगाने फैलावतात ती बाब जगासाठी मोठे आव्हानच आहे. त्यामुळे या भागात आजारामुळे होणाऱया मृत्यूचे प्रमाण आजही जास्त आहे.

धर्माच्या नावाखाली मोठा परिवार पोसणे हेही एक महत्त्वाचे कारण आहे असे आढळून येते. गेल्या शंभर वर्षापासून या भागातील देशांची सरकारे आणि जागतिक आरोग्य सारख्या संघटना लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्नशिल असतात. गरिबी आणि आजाराचे खरे मूळ हे धार्मिक आणि सामाजिक रुढी परंपरांना प्रोत्साहन देण्यातच आहे त्यामुळे धर्मसुध्दा एक मोठा जवाबदार घटक यासाठी आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. दुसरीकडे गरिबी आणि श्रीमंती या गोष्टी धर्माशी संबंधित असल्याचा अर्थ काढून त्यावर उपाय म्हणून लोकसंख्या वाढवत नेऊन आपल्या धर्माचे साम्राज्य स्थापित करण्याची जगात आजही परंपरा कायम आहेच. त्यामुळेच जोपर्यंत धर्माच्या संदर्भात जगभरातील लोकांचे मानसिक परिवर्तन घडून येत नाही तोपर्यंत ही समस्या मूळापासून उखडून काढणे कठीणच आहे.

ज्या अन्य धर्मीयांनी नंतर मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला अशा सामान्य धर्मांतरित मुस्लिम आणि ख्रिश्चनांमध्ये मागासलेपणाच्या सर्व समस्या कायम असल्याचे दिसून येते. इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मातील धर्मगुरूंनी मात्र अन्य धर्माच्या लोकांचे आपल्या धर्मात धर्मांतर करणे यास आपल्या अल्ला किंवा गॉडची सर्वोत्तम सेवा त्यांनी गृहित धरली आहे. आपल्या धर्माची लोकसंख्या वाढवत नेणे एवढेच त्यांचे आंधळे ध्येय आहे. त्याकरता भय दाखवण्याची, लोभ दाखवण्याची मुभा असल्याचे ते मानतात. युद्धात पराभूत देशातील जनतेला आपला धर्म स्वीकारायला लावण्यात मोठी धर्मसेवा केल्याचे त्यांनी मानले आहे.

ज्या देशात लोकशाही आहे त्या देशात धर्मांतर आणि सत्तांतर या गोष्टी अधिकच सोप्या होतात. कारण लोकशाहीत वोटबँक अधिक महत्त्वाची ठरते. लोकशाही असलेल्या देशात हत्याराने युद्ध होत नाहीत, मतपत्रिकेद्वारे मतदानाद्वारे युद्ध होतात. सत्ताप्राप्तीसाठीही त्याचा लाभ होतो आणि सत्ताप्राप्तीनंतर इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्माचा प्रचार प्रसार करणे अधिकच सोयीचे होते. वोटबँकेच्या आधारे सत्ता स्थापन करणाऱया ख्रिश्चन किंवा मुस्लीमांनी धर्माच्या आधारे सत्ता मिळवून तिचा वापर पुन्हा धर्म वाढवण्यासाठीच केला आहे. यातून ते आपल्या धर्माचा एक नवीन देश निर्माण करतात. मतदानातून सत्ताही मिळते, धर्मवर्चस्वही मिळते आणि देशही मिळतो. आशिया आणि आफ्रिकेत याची अनेक उदाहरणे पहायला मिळतात. धर्माच्या नावावर मते मिळवून युरोपीयन राष्ट्रांनी अनेक देश आपल्या ताब्यात घेतले होते. धर्मसेवेचे पुण्य पदरी पडले ते वेगळेच.

हिंदू आणि पारशी धर्मातील लोकांचा धर्मांतर करण्यावर अजिबात विश्वास नाही. पण मग त्यामुळे त्यांच्या नियंत्रणात असलेले प्रांतही त्यांच्या ताब्यातून गेले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांचे देश आणि त्यांची मातृभूमीसुद्धा हातून गेली आहे. भीती आणि लोभाच्या आधारावर केलेल्या धर्मांतरामुळे त्यांची संख्या तर कमी झालीच. शिवाय आपल्या संस्कृतीचे रक्षण करता येईल असा स्वतःचा देशही उरला नाही. त्याबाबतीत हिंदुस्थानचे उदाहरण जिवंत म्हणावे लागेल.

[email protected]