28 वैमानिक, 6 अधिकारी देशसेवेत दाखल

2

सामना ऑनलाईन , नाशिक

 दि. 11 (सा.वा.) – नाशिकजवळील गांधीनगर येथील कॉम्बट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा शानदार दीक्षान्त संचलन सोहळा आज पार पडला. यावेळी खडतर प्रशिक्षण पूर्ण करीत 28 वैमानिक आणि 6 अधिकारी देशसेवेत दाखल झाले. या सोहळ्याचा समारोप ऑपरेशन विजयया युद्धजन्य प्रात्यक्षिकाने झाला. वैमानिकांचे साहस, कौशल्य व अंगावर शहारे आणणाऱया कसरती पाहून उपस्थित थक्क झाले.

विशिष्ट सेवा पदक, परम विशिष्ट सेवा पदक प्राप्त आर्टिलरी स्कूलचे लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सलारीया यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दीक्षान्त संचलन सोहळा साजरा झाला. कॉम्बट एव्हिएटर्स कोर्स-31 पूर्ण करणाऱया 28 वैमानिक आणि एव्हिएशन हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर कोर्स-30 पूर्ण केलेल्या 6 अधिकाऱयांचे दीक्षान्त संचलन झाले. यावेळी कॉम्बट एव्हिएटर कोर्समधील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी कॅप्टन अंकित मलिक यांना सिल्व्हर चिता पदक, तर इन्स्ट्रक्टर कोर्समधील सर्वोत्कृष्ट मेजर प्रभप्रीत सिंग यांना मेजर प्रदीप अग्रवाल स्मृती चषक देवून गौरविण्यात आले. त्यानंतर ‘ऑपरेशन विजय’ हे युद्धजन्य प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यातील चित्तथरारक कसरतींमुळे युद्धभूमी अवतरल्याचा प्रत्यय आला.

(फोटोओळ)

नाशिकजवळील गांधीनगर येथील कॉम्बट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा दीक्षान्त सोहळा शनिवारी साजरा झाला. सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थींसमवेत लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सलारीया व अधिकारी.