वृद्ध मालकिणीवर विषप्रयोग करणाऱ्या आचाऱ्याला अटक

सामना ऑनलाईन । मुंबई

वृद्ध मालकिणीला जेवणातून विष खाऊ घालणाऱ्या एका आचाऱ्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. रियाझुल हक अलियास मंडल (33) असं या आचाऱ्याचं नाव आहे. पण, हे कृत्य त्याने का केलं, ते मात्र अद्याप कळू शकलेलं नाही.

कुलाबा येथील रहिवासी असलेली झीनिया खजोटिया (65) ही पारशी महिला 2017च्या जुलै महिन्यात सिंगापूरहून मुंबईत राहायला आली होती. मंडल हा झीनिया यांच्याकडे गेल्या 15 वर्षांपासून आचाऱ्याचं काम करतो. झीनिया मुंबईत आल्यापासून त्यांची तब्येत वरचेवर खराब होत होती. मंडलने बनवलेलं जेवण जेवल्यानंतर त्यांना त्रास होत होता. उलटी झाल्यासारखं वाटणं, चक्कर येणं, अन्नावरची वासना जाणं अशा अनेक तक्रारींनी त्या ग्रस्त होत्या. याबाबत त्यांनी कफ परेड येथे राहणारी आपली मुलगी ताहमिन हिलाही सांगितलं होतं.

11 ऑगस्ट रोजी ताहमिन आपल्या आईकडे राहायला आल्या होत्या. तिथे त्या दोघींनी मिळून ऑम्लेट आणि कॉफीचा नाश्ता केला. मात्र, नाश्ता केल्यानंतर लगेचच त्यांना उलट्यांचा आणि चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला. संशयापोटी ताहमिन यांनी वैद्यकीय मदत घेतली. कारण, त्यांच्या ऑम्लेटमध्ये लालसर रंगाचे रहस्यमय कण आढळून आले होते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी ऑम्लेटचे उर्वरित तुकडे प्रयोगशाळेत चाचणीसाठी दिले. त्या चाचणीतून जे निष्पन्न झालं ते धक्कादायक होतं. कारण, त्या ऑम्लेटच्या तुकड्यात थेलियम या विषारी धातूचे कण आढळले. याचा अर्थ गेल्या काही काळापासून मंडल झीनिया यांच्यावर विषप्रयोग करत होता.

त्यानंतर कुलाबा पोलिसांनी तत्काळ मंडल याला अटक केली. तो राहत असलेल्या खोलीत पोलिसांना काहीही संशयास्पद सापडलेले नाही. पण, या प्रकरणात एकटा मंडल सामील नसून त्यात त्यांच्या कुटुंबापैकीच अन्य कुणीतरी सामील असल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या दिशेनेही तपास सुरू असून मंडलचे कॉल डिटेल्सही तपासण्यात येत आहेत. कारण, मंडल याने असं करण्यामागचं कारण पोलिसांना सांगितलेलं नाही. पोलिसांनी झीनिया आणि ताहमिन यांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. झीनिया यांची आई काही वर्षांपूर्वी अचानक मरण पावली होती. त्यामागचं कारणंही अस्पष्ट होतं. मात्र, आता हा मंडलच्या जेवणामुळेच तिचा मृत्यू ओढवला असावा, असा संशय झीनिया यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

summary- cook-held-for-poisoning-his-mistress