परिचारिकांचं काम करताहेत रुग्णालयाचे आचारी!

24

सामना ऑनलाईन । लखनौ

लखनौ येथील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी अर्थात केजीएमयूमध्ये डॉक्टरांच्या मदतीसाठी आचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जे काम प्रशिक्षित सहाय्यकांनी करणं अपेक्षित आहे, ते काम या आचाऱ्यांना कराव लागत आहे.

एका हिंदी वर्तमानपत्राने या संबंधीचं वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार, केजीएमयूच्या शस्त्रक्रिया विभाग, अतिदक्षता विभाग, कॅथ लॅब आणि क्रिटिकल केअर वॉर्ड्समध्ये १० आचारी कार्यरत आहेत. शस्त्रक्रियेला लागणारी हत्यारांना निर्जंतूक करणं, जखमेचं ड्रेसिंग करणं तसंच अतिदक्षता विभागातील रुग्णांची काळजी अशी विविध कामं हे आचारी करत आहेत.

या आचाऱ्यांना अशा कोणत्याही वैद्यकीय सेवांचं प्रशिक्षण देण्यात आलेलं नाही. वास्तविक अशा कामांसाठी नियुक्त केलेले कर्मचारी हे संपूर्णतः प्रशिक्षित असावेत, असा मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचा नियम आहे. या नियमाला हरताळ फासत या वैद्यकीय विद्यापीठाने आचाऱ्यांना या कामाला जुंपलं आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी कुलसचिवांकडे याची तक्रार केली आहे. कारण, प्रशिक्षित नसल्यामुळे या आचाऱ्यांच्या हातून अनेक चुका होत आहेत. त्या चुकांचे परिणाम गंभीर होऊ नयेत यासाठी डॉक्टरांनी कुलसचिवांकडे धाव घेतली आहे.

विद्यापीठाच्या कुलसचिवांच्या म्हणण्यानुसार, हे आचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पण, यांच्याकडून वैद्यकीय सहाय्यकाची कामंही करवून घेतली जात असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे आता संबंधितांची चौकशी करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या