दिलखुलास डॉक्टर

मेधा पालकर

डॉ. कांतीलाल संचेतीनुकताच अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुण्यभूषण पुरस्कार त्यांना मिळाला. जगात कौतुक झालं तरी घरच्या कौतुकाची मौज न्यारीच असते. त्यानिमित्ताने डॉ. संचेतींशी मनमोकळ्या गप्पा.

शाळेत आम्हाला सुतारकामाचा आठवडय़ातून एक दिवस तास असायचा. मला लाकडाच्या वस्तू तयार करायला खूप आवडत असे. मी तयार केलेली लाकडाची बाहुली आमच्या भावे मास्तरांना खूप आवडली आणि त्यांनी ती वर्गात सर्व विद्यार्थ्यांना दाखविली. तिची ‘ऍनाटॉमी’ मास्तरांना खूप आवडली. छिन्नी आणि हातोडा घेऊन वस्तू तयार करण्याची आवड पुढे अस्थिरोगतज्ञ म्हणून खूप उपयोगी पडली…पुण्यातील विख्यात अस्थिरोगतज्ञ पद्मविभूषण डॉ. कांतीलाल संचेती आपला जीवनप्रवास अत्यंत मिस्किल, विनोदी शैलीत सांगत होते. डॉक्टरांना पुण्याचा प्रतिष्ठेचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मूळचे पुणेकरच असलेल्या डॉ. के.एच. संचेती यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी शालेय जीवन, वैद्यकीय क्षेत्रातील प्रवास अत्यंत मनमोकळा उलगडला.

एका सर्वसामान्य कुटुंबात डॉ. संचेती यांचा जन्म झाला. वडिलांचे किराण्याचे दुकान. पुण्याच्या नारायण पेठेत डॉक्टर लहानचे मोठे झाले. त्यांची आई सकाळी ४ वाजता उठून पिठीसाखर दळायची. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी खूप कष्ट घ्यायची. आईचे कष्ट आणि वडिलांची सचोटी, प्रामाणिकपणाचे संस्कार हेच डॉ. संचेती यांच्या यशाचे रहस्य आहे.

डॉ. संचेती म्हणाले, अहो मी अभ्यासात काही फार हुशार नव्हतो. मला दहावीच्या परीक्षेला ४६ टक्के मार्क पडले. मध्यमवर्गीय घरातला मी अभ्यासातही मध्यम होतो. पण माझी कष्टाची तयारी असायची. लहानपणापासून मी आईचे कष्ट पहात आलो. आताची बारावी म्हणजे त्यावेळच्या इंटर सायन्स परीक्षेत मला डिस्टिंक्शन मिळाले. माझे दोन मित्र एक डॉ. अशोक कुकडे आणि डॉ. विजय कर्णिक आम्ही जवळच रहायचो. पुढे आम्हाला तिघांनाही बी. जे. मेडिकलला सरळ प्रवेश मिळाला. महाविद्यालयात शिकत असताना आम्हाला शिकविणाऱया सरांकडे एक बाई आल्या. त्यांचा जबडा सरकलेला होता. तीन आठवडय़ापूर्वी सरकलेला जबडा मी बसवू का? असे मी आमच्या सरांना विचारले. ते म्हणाले, पहा प्रयत्न करून, पण मी तो सहज बसवू शकलो. त्यांनतर मी आर्थोपेडिक सर्जन व्हायचे पक्के केले. पुण्यातला पहिला आर्थोपेडिक सर्जन म्हणून मी शिक्षण पूर्ण करून, जंगली महाराज रस्त्यावर भाडय़ाचा दवाखाना घेतला. १० खाटांचा दवाखाना होता. प्रॅक्टिस करत असताना खूप प्रकारच्या आजारांवर उपचार केले. पुढे हॉस्पिटलसाठी जागा घेतली. जिथे आज संचेती हॉस्पिटल उभे आहे. १९६५ सालापासून मी प्रॅक्टिस करतो आहे. जवळपास ५१ वर्षे झाली. आजही वयाच्या ८१ व्या वर्षी मी रोजचे ४० ते ५० रुग्ण तपासतो.

माझ्याकडे येणाऱया रुग्णांशी मी दोन मिनिटे बोलतो. चटकन एक विनोद सांगतो. हे त्यांना खूप आवडतं. मलाही त्यांच्या चेहऱयावरचे समाधान पाहून आनंद होतो. त्यांच्या वेदनेवर हलकीशी ही फुंकरच असते.

वैद्यकीय सेवेत असलो तरी, या क्षेत्रातही नवे तंत्रज्ञान येत आहे. स्वतःला अद्ययावत ठेवण्यासाठी मी परदेशात जाऊन तिथले तंत्रज्ञान शिकून घेतो. पी.एचडी, ऑर्थो विषयात एफ.आर.सी.एस. झालो. हे तंत्रज्ञान मला वैद्यकीय क्षेत्रासाठी उपयोगी पडते.

हाडांचा कमकुवतपणा वाढतोय!

अलीकडे एक गोष्ट जाणवते ती म्हणजे लोक खूप वेगाने वाहन चालवतात. जलद गतीने वाहन चालविण्याइतकेच अपघाताचे प्रमाणही वेगाने वाढत आहे. पूर्वी सायकलवरून कोणी पडले की, एकच हाड तुटायचे. आता ‘पॉलिट्रोमा’ म्हणजेच एकावेळी ४ ते ५ हाडे तुटण्याचे प्रकार घडतात. कारण हाडांची ठिसूळता. प्रिझरवेटिव्ह अन्न आणि अवेळ यामुळे हाडांचा कमकुवतपणा वाढतो आहे. त्यासाठी आहारात २५ टक्के कडधान्य, २५ टक्के सॅलेड, २५ टक्के पालेभाज्या आणि पोळी, भाकरी, भात यांचा प्रमाणशीर समावेश असला पाहिजे. तरच हाडांना बळकटी मिळेल. मुख्य म्हणजे व्यायाम महत्त्वाचा आहे. जो आज कमी झालेला दिसतो आहे. वाढत्या वयानुसार येणाऱया अपघातांचे प्रमाणही खूप आहे. अशा परिस्थितीत शरीराची निगा महत्त्वाची आहे, असे संचेती म्हणाले.

आनंदी स्वभाव, नियमित आहार

मी सकाळी ४ ला उठतो. दोन तास व्यायाम करून मी ६.३० ला संचेती हॉस्पिटलमध्ये येतो. दुपारच्या जेवणाचा डबा सोबत असतो. ६ते  संध्याकाळी ६ वाजताच थेट घरी जातो. सतत कामात राहतो. आनंदी स्वभाव, नियमित आहार आणि तृप्त भावना यामुळेच मी ८१ वर्षांचा वाटत नाही. पुण्याचा चांगला संस्कार माझ्यावर झाला आहे. माझी जन्मभूमी, कर्मभूमी पुणे आहे. जगभरात फिरलो असलो, तिथे माझे सत्कार झाले असले तरी, घरातल्या माणसांनी केलेल्या कौतुकाचा आंनद काही वेगळाच असतो. तो मला पुण्यभूषण पुरस्काराच्या निमित्ताने झाला आहे. रुग्णांमध्ये व्यायामाची मोठय़ा प्रमाणात जनजागृती करून, त्यांना व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहित करायचंय, असे संचेती म्हणाले.

नाते चांगले हवे!

डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील नाते चांगले राहिले पाहिजे.  डॉक्टरांवरील वाढते हल्ले हे चांगले लक्षण नाही. हे जरी खरे असले तरी, डॉक्टरांनीही रुग्णांशी दोन चांगले शब्द बोलावे. रुग्णांचा निम्मा आजार पळून जातो. हल्लीचे अपघात खूपच गंभीर होऊन माणसे दगावतात. तो अनपेक्षित मृत्यू नातलगांना सहन होत नाही. पण त्याचवेळी रुग्णाचे नातलगही खूप उतावळे होऊन कायदा हातात घेतात. वैद्यकीय उपचारही खूप महागडे झाले आहेत. संवेदनशीलता कमी होत आहे. याचा सर्वांनीच विचार केला पाहिजे. तरच पूर्वीसारखे रुग्ण आणि डॉक्टरांमधील नाते तयार होईल यात शंकाच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.