नैसर्गिक कारणांमुळे कोणतीही संस्था अडचणीत येत नाही – शेखर चरेगावकर

2

सामना प्रतिनिधी । अलिबाग

चुकीचे व्यवस्थापन व व्यवहारात पारदर्शकता नसणे यामुळे पतसंस्थां अडचणीत येतात. नैसर्गिक कारणांमुळे कोणतीही पतसंस्था अडचणीत येत नाही. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी केले.

रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांचा महासंघ व सहकार भारती सहकारी प्रशिक्षण संस्था कराड यांच्या संयुक्त विद्यमाने पतसंस्था संचालक व कर्मचारी यांच्यासाठी प्रशीक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. भाग्यलक्षी हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन शेखर चरेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन समारंभात शेखर चरेगावकर बोलत होते. सहकार भारतीचे राष्ट्रीय महासचीव डॉ. उदय जोशी, रायगड जिल्हा नागरी पतसंस्थांचा महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. जे. टी. पाटील, महाराष्ट्र राज्य पतसंस्थांचा महासंघाचे संचालक सुरेश पाटील, रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांचा महासंघाचे सचीव योगेश मगर, सहाय्यक निबंधक अशोक मोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पतसंस्थांनी काळानुरूप होणारे बदल स्वीकारावेत. समजाच्या गरजा ओळखून समाजाभिमुक काम करावे. तरच पतसंस्था मोठ्या होतील पतसंस्थांच्या संचालकांनी केवळ निरीक्षक म्हणून काम न करता परीक्षक म्हणून काम करायला हवे. आपल्यातील त्रुटी ओळखून त्या दुर केल्या पाहिजे. आपल्या योजना बदलल्या पाहिजेत, असे चरेगावकर म्हणाले.

अडचणी या येतच असतात त्यातून मार्ग काढणे हेच व्यवस्थापकीय कौशल्य असते. संचालक व कर्मचारी प्रशिक्षीत असणे आवश्यक आहे, असे डॉ. उदय जोशी म्हणाले. अ‍ॅड. जे. टी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. दिलीप जोशी यांनी सुत्रसंचालन केले.