नागपूर रेल्वे स्थानकावर 98 जिवंत काडतुसं आढळली, तपास सुरू

13
nagpur-station

सामना प्रतिनिधी । नागपूर

देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. तसेच यंदा पुलवामा हल्ला, हिंदुस्थानचे हवाई हल्ले आणि पाकिस्तानसोबतचे तणावपूर्ण संबंध यामुळे दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. अशातच नागपूर रेल्वे स्थानकावर 98 जिवंत काडतूसे आढळल्याने खळबळ उडाली आहे.

नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 7 वर सोमवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास ही काडतूसे मिळाली. मेंटनन्स विभागात काडतूसे आढळल्यानंतर तात्काळ कारवाई करत सर्व काडतुसे जप्त करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील हे जिवंत राऊंड कुणाचे? कुणी आणले की चुकून आले? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्यामुळे नागपूरसह देशभरात सतर्कतेचा इशारा दिला होता. नागपूर रेल्वे स्थानक संवेदनशील यादीत येते. याच पार्श्‍वभूमीवर येथे कडेकोट बंदोबस्त आहे. अलिकडेच येथील अनेक प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहेत. अशा बंदोबस्तात खरड्याच्या तीन बॉक्समध्ये 9 एम.एम. चे 98 राऊंड आढळले.

नेहमी प्रमाणे कंत्राटी कर्मचारी लीलाधर राऊत (37) हा खोली साफ करत होता. आलमारीच्या खाली झाडू मारत असतानाच त्याला हे जिवंत बुलेट आढळले. या घटनेची माहिती त्याने वरिष्ठांना दिली. लगेच आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिस नियंत्रण कक्षाला सूचना देण्यात आली. सिनिअर सेक्शन इंजिनिअर धनंजय काणे यांनीही पोलिसांकडे धाव घेतली. माहिती मिळताच आरपीएफ निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, सहायक पोलिस निरीक्षक मुबारक शेख, उपनिरीक्षक रवी वाघ, उपनिरीक्षक गौरीशंकर एडले, हेड कॉन्स्टेबल गजानन शेळके, रोशन मोगरे यांनी घटनास्थळ गाठून पंचासमक्ष पंचनामा करून संपूर्ण बुलेट हस्तगत केले. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी नोंद केली असून तपास सुरू केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या