उठा उठा दिवाळं वाजलं!सरकार ताळय़ावर आलं!!

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

छोटय़ा व्यापाऱयांसाठी जाचक ठरलेल्या ‘जीएसटी’मध्ये दुरुस्ती करण्यासाठी शिवसेनेने सतत केलेली मागणी, चिंताजनक अर्थव्यवस्थेवरून यशवंत सिन्हा, अरुण शौरी यांच्यासारख्या भाजप नेत्यांनीच केंद्राविरोधात उठवलेली टीकेची झोड, सोशल साइटस्वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उडवली जाऊ लागलेली खिल्ली आणि तळागाळात व्यक्त होणाऱया भाजपविरोधी जनक्षोभापुढे मोदी सरकारला अखेर आज गुडघे टेकावे लागले. ‘जीएसटी’ परिषदेच्या आज झालेल्या बैठकीत छोटे व्यापारी आणि ज्वेलर्सना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. त्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एका पत्रकार परिषदेत केली.

जीएसटीच्या कंपाऊंडिंग स्कीमखाली या आधी ७५ लाखांची उलाढाल असलेले व्यावसायिक यायचे. आता १ कोटीपर्यंतची उलाढाल असलेल्या व्यावसायिकांनाही त्या स्कीममध्ये सामावून घेण्यात आले आहे असे जेटली यांनी सांगितले. कंपाऊंडिंग स्कीमखाली तीन प्रकारचे व्यावसायिक येतात. त्यातील पहिल्या वर्गातील व्यापारी एक टक्का कर देतील. दुसरा वर्ग उत्पादकांचा असून ते दोन टक्के कर देतील तर तिसरा वर्ग रेस्टॉरंटस् व्यावसायिकांचा असून ते पाच टक्के कर देतील असे सांगून ते म्हणाले की, ७५ लाखांच्या उलाढालीची मर्यादा वाढवून १ कोटी करण्यात आल्याने तीनही वर्गांतील व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे.

  • ज्या उद्योगांची उलाढाल दीड कोटीपर्यंत आहे त्यांची दर महिन्याच्या परताव्यातून सुटका करण्यात आली आहे. आता त्यांना दर तीन महिन्यांनी परतावा द्यावा लागणार आहे.
  • रत्न आणि दागिन्यांना जीएसटी नोटिफिकेशनच्या कक्षेबाहेर ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भात नवे नोटिफिकेशन काढण्यात येणार आहे.
  •  कंपाऊंडिंग योजनेंतर्गत ७५ लाखांची मर्यादा वाढवून ती १ कोटी करण्यात आली आहे. नव्या निर्णयाअंतर्गत येणारे व्यापारी तीन महिन्यांनी आपल्या एकूण विक्रीच्या १ टक्का कर जमा करून विवरण सादर करू शकतील.
  • कंपाऊंडिंग डीलरला इतर राज्यांमध्ये माल विकण्याचा अधिकार आणि इनपुट सबसिडीचा लाभ देण्यासाठी पाचसदस्यीय मंत्रीगट स्थापणार.
  • रिव्हर्स चार्जची व्यवस्था पुढील वर्षीच्या ३१ मार्चपर्यंत स्थगित, त्याअंतर्गत यापूर्वी नोंदणीकृत करदात्यांना नोंदणीकृत नसलेल्यांकडून माल खरेदी केला तर कर द्यावा लागत होता. त्यातून त्यांची ३१ मार्चपर्यंत सुटका झाली आहे.
  • वातानुकूलित उपाहारगृहांना लावण्यात येणाऱया करात सूट देण्यावर येत्या १० दिवसांत विचार करणार.

किमान २७ वस्तूंवरील कर घटणार आहेत

  • १२ टक्क्यांवरून ५ टक्के- स्लाईस ड्राईड मँगो, खाकरा, प्लेन चपाती, मुलांचे पॅक्ड फूडस्, अनब्रॅण्डेड नमकीन, आयुर्वेदिक औषधे, पेपर वेस्ट, आर्टिफिशियल ज्वेलरी
  • १८ टक्क्यांवरून ५ टक्के-प्लॅस्टिक, रबर वेस्ट
  • २८ टक्क्यांवरून १८ टक्के-स्टेशनरी, डिझेल इंजिनचे पार्टस