परतीच्या पावसाचा कापूस पिकाला फटका

सामना ऑनलाईन । भुसावळ

दिवाळी पाच दिवसांवर येऊन ठेपली. मात्र अद्याप कापूस खरेदी केंद्र सुरू नाही. परतीच्या पावसामुळे ओल्या झालेल्या कापसाच्या भावात तब्बल एक हजार रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. खासगी बाजारपेठेत कापसाला तीन हजार ते चार हजार २०० रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे.

गेल्या वर्षी खासगी बाजारपेठेत पाच हजार रुपये क्विंटलने कापसाची खरेदी सुरू झाली होती. नोटाबंदीचा प्रभाव होता. कापसाचा भाव मात्र डिसेंबर ते मार्च महिन्यात पाच हजार ७०० रुपयांपर्यंत पोहोचला होता. एप्रिल महिन्यात कापसाचे फरदड दुय्यम दर्जाचे उत्पन्न जास्त आल्यामुळे प्रथम दर्जाच्या कापसाचे भाव पुन्हा कमी झाले होते. फरदडला चार हजार ते चार हजार ८०० रुपये भाव होता. त्यामुळे प्रथम दर्जाला कापसाला मंदी आली होती. मात्र मे व जून महिन्यात प्रथम दर्जाचा कापूस ५ हजार ३०० रुपयांपर्यंत विकला गेला होता.

गेल्या वर्षी कापसाचे उत्पन्न चांगले झाले होते. त्यात यावर्षी कापसाचा पेरा देशात १८ तर जगात १० टक्के वाढला. सध्या कापूस वेचणीच्या काळात असताना परतीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे. सध्या कोरडय़ा कापसाला चार हजार ५०० भाव आहे. तर ओला कापूस मात्र तीन हजार ५०० ते चार हजार रुपये भावाप्रमाणे खरेदी केला जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सरकी व ठेपचे भाव खूपच कमी आहे. त्यामुळे कापसाच्या भावावर त्याचा परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी ठेपचे भाव ऑक्टोबरमध्ये दोन हजार होते. यावर्षी हे भाव एक हजार १०० रुपये आहे. तब्बल ८०० ते ९०० रुपये भावाची तफावत आहे. सरकीचे भाव ही गेल्या वर्षी दोन हजार ७०० रुपये होते. यावर्षी ते एक हजार ८०० ते एक हजार ९०० इतके आहे. त्याचा परिणाम कापसावर दिसून येत आहे. सध्या जिल्ह्यात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने काही प्रमाणात कापूस ओला येत आहे. मात्र दिवाळीसाठी शेतकऱ्यांना हा कापूस खासगी बाजारपेठेत मिळेल त्या भावाने विकावा लागत आहे.