मुलाला दगडावर बसवून आईची प्रियकरासोबत सज्जनगडावर आत्महत्या

महेश पवार, सातारा

निलेश मोरे आणि पूनम मोरे या प्रेमी युगुलाने साताऱ्यातील सज्जनगडावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करतेवेळी पूनमचा सात वर्षांचा मुलगाही तिथेच होता. त्याला एका ठिकाणी बसवून मग दोघांनी आत्महत्या केली. गेल्या काही दिवसांपासून पूनम ही मुंबईतून बेपत्ता झाली होती. तिचा शोध घेत असताना पोलिसांना तिच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन सज्जनगडावर असल्याचं कळालं होतं.

असं सांगितलं जातंय की निलेश अंकुश मोरे आणि पूनम अभय मोरे हे दोघे मूळचे पाटण तालुक्यातील बोडकेवाडी गावचे रहिवासी होते. हे दोघे नातेवाईक असल्याचंही बोललं जातंय. दोघांच्या प्रेमसंबंधाला विरोध असावा आणि या विरोधामुळेच पूनमचं लग्न दुसरीकडे लग्न लावून देण्यात आलं असावं असा अंदाज बांधला जातोय. लग्नानंतरही दोघांमधील दुरावा कमी झाला नसावा आणि एकमेकांपासून दूर रहात असल्याची खंत बोचत असल्याने दोघांनी आत्महत्या केली असावी असा संशय वर्तवण्यात येत आहे. मात्र आपण उचलत असलेल्या या टोकाच्या पावलामुळे आपल्या मुलाचं कसं होणार हा विचार पूनमच्या मनाला कसा काय शिवला नाही याचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.