आई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

आपल्या आई वडिलांचं घर हे प्रत्येक मुलासाठी जगातील सर्वात सुरक्षित जागा असते. मात्र अमेरिकेतील 13 भावंडांना त्यांच्या आई वडिलांचे घर म्हणजे अक्षरश: नरकासारखे वाटत होते. या मुलांवर त्यांच्या पालकांनी अनन्वित अत्याचार केले आहेत. या मुलांचे पालक त्यांना साखळीने बांधून ठेवायचे व आठवड्यातून एकदाच खायला द्यायचे. अनेकदा त्यांना बेदम मारहाण देखील केली जायची. याप्रकरणी पोलिसांनी त्या नराधम माता पित्याला अटक केली असून त्यांनी न्यायलयात त्यांचा गुन्हा कबूल केला आहे.

turpin-couple-1

अमेरिकेतील सँटिना येथे राहणाऱ्या डेव्हिड टर्पिन व लुईस टर्पिन यांना 13 मुलं आहेत. त्यातील सर्वात मोठा मुलगा 29 वर्षांचा आहे तर सर्वात लहान दोन वर्षांची मुलगी आहे. डेव्हिड व लुईस यांना त्यांच्या मुलांवरच अत्याचार करण्यात असूरी आनंद मिळायचा. त्यासाठी ते मुलांना घरातच साखळीने बांधून ठेवायचे. त्यांना खायला देखील आठवड्यातून एकदा किंवा जर त्या दोघांना दया आली तर दोनदा दिले जायचे. तसेच मुलांनी आरडा ओरडा केला तर त्यांना बेदम मारहाण देखील केली जायची. त्यांना प्रात:विधी देखील बसल्या जागीच कराव्या लागायच्या.

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात या 13 मुलांपैकी एका 17 वर्षाच्या मुलीने डेव्हिड आणि लुईसची नजर चुकवून घरातून पळ काढला. त्यानंतर ती थेट पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीस जेव्हा टर्पिन दांपत्याच्या घरी पोहोचले तेव्हा मुलांची अवस्था बघून ते देखील हादरले. घरात सर्वत्र घाण होती. मुलांना साखळ्यांनी बांधलेले होते. नीट जेवण मिळत नसल्याने त्यांचे वजनही फार कमी झालेले होते. पोलिसांनी तत्काळ त्या सर्वांना रुग्णालयात दाखल केले व टर्पिन दांपत्याला अटक केली.