अबब! गुन्हेगाराला न्यायालयाने ठोठावली १३ हजार २७५ वर्षांची शिक्षा

सामना ऑनलाईन । बँकॉक

अवैध मार्गाने पैसे दुप्पट करण्याची स्कीम चालवण्यासाठी थायलंड येथील एका माणसाला चक्क १३ हजार २५४ वर्षांच्या कैदेची शिक्षा झाली आहे. पुडित कितिथार्दिकलोक असं या ३४ वर्षीय इसमाचं नाव आहे. पैसे दुप्पट करून देणारी एक स्कीम पुडित चालवत होता.

पुडितची ही स्कीम बऱ्यापैकी यशस्वी झाली होती. त्याच्या मधाळ बोलण्याला आणि खोट्या आश्वासनांना भुलून तब्बल ४० हजार लोकांनी त्याच्या स्कीममध्ये पैसे गुंतवले होते. या लोकांनी गुंतवलेल्या रकमेचा आकडा १६ कोटी डॉलर्स इतका झाला होता. मात्र, पुडितने या सर्व गुंतवणूकदारांची फसवणूक केली. अवैधरितीने गुंतवणूक करणे आणि त्यासाठी लोकांना फसवणे या गुन्ह्यांसाठी त्याला न्यायालयाने १३ हजार २५४ वर्षांची शिक्षा ठोठावली.

पुडितने इतक्या मोठ्या रकमेचा गैरव्यवहार केल्याचं न्यायालयात कबूल केलं आहे. त्यामुळे त्याची शिक्षा अर्ध्याने कमी होण्याची शक्यता आहे. या कारावासासोबतच पुडित आणि त्याच्या सहभागी कंपन्यांना न्यायालयाने १.७ कोटी डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. या दंडाच्या रकमेतून त्याने फसवलेल्यांचे पैसे परत दिले जाणार आहेत.