फितूर झालेल्या साक्षीदारास शिक्षा

सामना प्रतिनिधी । जालना

जालना येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश निरज पी. धोटे यांनी घनसावंगी तालुक्यातील सौदलगाव येथील शेख सालार शेख अमीन यास साक्षी पुराव्यादरम्यान फितूर झाल्याबद्दल कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांची साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

४ मे २००३ रोजी फिर्यादी व साक्षीदार शेख सालार शेख याची मुलगी रुखया हिला सासरचे लोकांनी विहीर खोदण्यासाठी व मोटारसायकल घेण्यासाठी पैशाची मागणी करून तिचा मानसिक व शारीरिक छळ करीत होते, त्यांच्या त्रासाला कंटाळून रुखया हिने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली, अशा आशयाची फिर्याद घनसावंगी पोलीस ठाण्यात दिल्यावरून गुन्हा दाखल केला होता. या खटल्यातील साक्षीपुराव्या दरम्यान फिर्यादी व साक्षीदार हा फितूर झाल्याने त्यांच्या विरोधात तत्कालीन न्यायाधीश बी. आर. कांबळे, तद्र्थ जिल्हा कलम ३४४ फौजदारी प्रक्रिया संहिताप्रमाणे त्यांच्या विरोधात खटला चालविण्याचा आदेश दिला. त्यामुळे साक्षीदार त्या आदेशाच्या विरोधात उच्च न्यायालय, संभाजीनगर येथे रिट पिटीशन दाखल केले होते. सदरचे रिट पिटीशन उच्च न्यायालयाने खारीज केले.

त्यामुळे या प्रकरणात जालना येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यादरम्यान साक्षीदार, फिर्यादी शेख सालार याने दिलेली फिर्याद व न्यायालयात झालेली साक्ष आणि त्या पुष्ट्यार्थ दिलेल्या शपथपत्रानुसार हा फिर्यादी, साक्षीदाराने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे, असा युक्तिवाद जालना जिल्हा सहायक अभियोक्ता वाल्मीक घुगे यांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने फिर्यादी, साक्षीदार शेख सालार शेख आमीन यास कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास पंधरा दिवसांची साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.