‘डीएसके’ना धक्का, न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

सामना ऑनलाईन । पुणे

पुणे, कोल्हापूर, मुंबईसह अनेक ठिकाणच्या शेकडो गुंतवणूकदारांना फसवणाऱ्या बिल्डर दीपक सखाराम कुलकर्णी म्हणजेच डीएसकेंना न्यायालयाने धक्का दिला आहे. पुणे सत्र न्यायालयाने डी.एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. मंगळवारी डीएसकेंच्या अटकपूर्व जामीनावर दोन्ही बाजूंनी युक्तवाद ऐकल्यानंतर आज (बुधवार) न्यायालयाने यावर आपला निर्णय दिला आले. डीएसकेचा जामीन अर्ज फेटाळल्याने आता पोलीस काय कारवाई करतात याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

डीएसकेकडे शेकडो गुंतवणूकदारांचे पैसे अडकल्याने ते अडचणीत आले होते. त्यांच्याविरोधात हजारो गुंतवणूकदारांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने डीएसकेविरोधात ३०० गुंतवणूकदारांना फसविल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच मुंबईतील सुमारे १४४ जणांनी डीएसकेविरोधात तक्रार दाखल केली असून कोट्यावधींचा गंडा घातल्याचा आरोप केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही सुमारे ६००च्या वर गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि माजी सैनिकांचा समावेश असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

धन धना धन, कायम ठेव अशा वेगवेगळ्या स्कीमच्या नावाखाली १२ ते १४.४ टक्के परतावा देण्याचे आमिष डीएसकेकडून दाखविण्यात आले. इतकेच नाही तर पाचपेक्षा अधिक वर्षे गुंतवणूक केल्यास दुप्पट रक्कम देण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. सुरुवातीला काहींना परतावा मिळाला; पण जानेवारी-फेब्रुवारीत पैसे मिळायचे बंद झाल्याचे गुंतवणूकदारांनी तक्रारीत म्हटले आहे.