डॉ. दाभोलकर प्रकरण; तपासात प्रगती न झाल्याने सीबीआयवर न्यायालयाचे ताशेरे

सामना प्रतिनिधी, पुणे

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात राजेश बंगेरा, अमित दिगवेकर यांच्या पोलीस कोठडीदरम्यान सीबीआयने केलेल्या तपासाबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. तपासामध्ये प्रगती न झाल्यामुळे न्यायालयाने सीबीआयवर ताशेरे ओढले. दरम्यान, या दोघांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्याची मागणी सीबीआयच्या वकिलांनी केली. मात्र, त्यांच्याकडे नेमका काय तपास करायचा आहे? हे पटवून देता न आल्यामुळे बंगेरा, दिगवेकर या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तर, शरद कळसकर याच्या पोलीस कोठडीत 15 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्याचा आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम.ए. सय्यद यांनी दिला.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या कटामध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून गौरी लंकेश हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राजेश बंगेरा, अमित दिगवेकर यांना, तर नालासोपारा स्फोटकेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शरद कळसकर याला सीबीआयने डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी ताब्यात घेतले. दरम्यान, बंगेरा, दिगवेकर, कळसकर यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने तिघांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.

सीबीआयतर्फे विशेष सरकारी वकील विजयकुमार ढाकणे यांनी युक्तिवाद केला. सीबीआयमार्फत सुरू असलेल्या तपासाची माहिती यावेळी अॅड. ढाकणे यांनी केस डायरीच्या माध्यमातून न्यायालयाला दिली. दरम्यान, दिगवेकर, बंगेरा यांच्या 14, तर कळसकर याच्या पोलीस कोठडीमध्ये 17 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्याची मागणी त्यांनी केली. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येतील शूटर कळसकर आणि अंदुरेला पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण बंगेरा याने दिले आहे. दिगवेकर हा डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा मास्टरमाइंड डॉ. कीरेंद्रसिंह ताकडे याच्या संपर्कात होता. त्याने या प्रकरणात रेकी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तापासासाठी तिघांच्या कोठडीत वाढ करावी, असा युक्तिवाद अॅड. ढाकणे यांनी केला.

बंगेरा, दिगवेकर यांना देणार कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात

राजेश बंगेरा, अमित दिगवेकर यांना ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली. दरम्यान, या दोघांचा डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमध्ये सहभाग असल्याच्या संशयावरून सीबीआयमार्फत तपासासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने आज या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बंगेरा आणि दिगवेकर यांना कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्यांना काही दिवस येरवडा कारागृहात ठेवून 17 सप्टेंबर रोजी कर्नाटकातील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

summary- court slams cbi over dr. narendra dabholkar case