पुन्हा कालव्या लगतच्या रस्त्याला तडे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

1

सामना प्रतिनिधी । पुणे

पुण्यातील दांडेकर पुलाजवळ मुठा कालवा फुटून मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याची घटना ताजी असतानाच, शुक्रवारी पुण्यातील पर्वती पायथा राम मंदिर जनता वसाहत येथे कालव्यालगतच्या रस्त्याला तडे गेले आहेत. त्यामुळे पुन्हा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे तडे पाहून या परिसरातले नागरीक घाबरले असून त्यांनी मागणी केली आहे की   प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घेऊन दुरुस्तीचे काम करावे.

पुण्यात दांडेकर पुलाच्या वरच्या बाजूला कालव्याला काही दिवसांपूर्वी भगदाड पडले होते. या दुर्घटनेने दांडेकरपूल झोपडपट्टीत नागरिकांचे घर-संसार वाहून गेले होते. कालव्याच्या पाण्यामुळे जवळपास 500 कुटुंबे बेघर झाली होती. मात्र हाच कालव्याल पर्वतीच्या जनता वसाहत परिसरात कालव्यालगतच्या रस्त्याला तडे गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुन्हा कालवा फुटल्यास अनेकांचे संसार वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.