उढाण कंढारी येथे घरांना अचानक तडे गेल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

सामना प्रतिनिधी । तीर्थपुरी

जालना जिल्ह्यातील व घनसावंगी तालुक्यातील उढाण कंढारी येथे सात घरांसह सिमेंट रस्त्याला अचानक तडे जाऊन भिंती खचल्याने गावकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

गावातील हनुमंतराव उढाण, ज्ञानेश्वर उढाण, मधुकर उढाण, नारायण लांडे, बळीराम लांडे, बाबुराव उढाण, गंगुबाई शिंदे या सात जणांचे एकलगट घरे असून चार ते पाच दिवसांपासून त्यांच्या घरातील भिंतीसह फरशीला अचानक तडे जाऊ लागले, सुरुवातीला हे त्यांच्या लक्षात आले नाही. परंतु हळूहळू तडे गेलेल्या ठिकाणाची रुंदी वाढल्याने तसेच भिंती खचल्याने दरवाजे लावतांना ते लागत नसल्याने हा सर्व प्रकार लक्षात आला. ग्रामस्थानीं बारकाईने परिसराची पाहणी केली असता सिमेंट रस्त्याला सुद्धा मधोमध भेग पडल्याचे दिसून आले. दरम्यान या प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नेमके हे कशामुळे झाले असावे याविषयी तर्क वितर्कांला मात्र उधाण आले आहे.

दरम्यान तलाठी एन.व्ही. काचेवाड यांनी याप्रकरणी पंचनामा केला असून तहसीलला अहवाल पाठवला आहे. दरम्यान घरं खचल्याने गावात भीतीचे वातावरण पसरल्याने काही अनर्थ घडण्यापूर्वी भूगर्भ विभागाने याची तात्काळ पाहणी करण्याची मागणी बाळासाहेब जाधव यांच्यासह ग्रामस्थानीं केली आहे.