देवनार डंपिंग ग्राऊंडवर 40 किलोवॅट वीज बनवणार

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईकरांची कचऱयापासून सुटका कण्यासाठी विविध उपाययोजना करणाऱ्या पालिकेने देवनार डंपिंग ग्राऊंडवर कचऱयापासून वीजनिर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन महिन्यांत या कामाची प्रक्रिया सुरू होणार असून या ठिकाणी दररोज 40 किलोवॅट वीज तयार करण्यात येईल.

मुंबईतून दररोज 7,200 मेट्रिक टन कचरा जमा होतो. हा कचरा सध्या देवनार, मुलुंड आणि कांजुरमार्ग डंपिंग ग्राऊंडवर टाकला जातो. सध्या निर्माण झालेल्या कचऱ्याच्या प्रश्नामुळे देवनार डंपिंग ग्राऊंडवर सुरू होणारा वीज प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सध्या पालिकेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी कचऱयापासून खतनिर्मिती करण्याचे महत्त्वाकांशी प्रकल्प राबवण्यात येत आहेत. शिवाय रहिवाशांना ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवण्याचे आवाहन करून कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे धोरण आखले जात आहे. कचऱ्याबाबत रहिवाशांमध्ये विविध माध्यमांतून जनजागृतीही केली जात आहे.

मुलुंडचा कचरा देवनार, कांजूरला
मुंबईचा दीड हजार मेट्रिक टन कचरा टाकला जाणारे मुलुंड डंपिंग ग्राऊंड 1 ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. यातील एक हजार मेट्रिक टन कचरा देवनार डंपिंग ग्राऊंडवर तर 500 मेट्रिक टन कचरा कांजुरमार्ग डंपिंग ग्राऊंडवर टाकला जाणार आहे.

देवनार डंपिंग ग्राऊंडवर सुरू होणाऱ्या वीज प्रकल्पामुळे कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न मोठय़ा प्रमाणात मिटणार आहे. या ठिकाणी दररोज सहा हजार मेट्रिक टन कचऱयावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती केली जाईल. निर्माण होणारी वीज कंत्राटदार विकू शकणार असून ठरावीक प्रमाणापेक्षा अधिकची वीज निर्माण झाल्यास ही वीज पालिकेला मिळणार आहे.
– विश्वास शंकरवार, सहाय्यक आयुक्त