गमतीदार चिडवणं

शिरीष कणेकर

प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन तडाखेबंद डावखुरा फलंदाज व कॉमेंटेटर डेव्हिड हुक्स यानं मायदेशात ‘नाइट क्लब’च्या बाहेर कोणाशीतरी पंगा घेतला. सर्व संबंधित दारूच्या अमलाखाली होते. हुक्सशी बाचाबाची करणारा जास्तच टग्या निघाला. त्यानं काहीतरी हुक्सच्या डोक्यात घातलं. त्यात हुक्सला प्राण गमवावे लागले. विकेट गमावण्यापेक्षा हा खूपच गंभीर मामला होता. हुक्सनं सोन्यासारखा जीव गमावला. या दुर्दैवी घटनेचे जगभर क्रिकेट विश्वात तीव्र पडसाद उमटले.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या मैदानावरील गैरवर्तणुकीबद्दल लिहिताना सुनील गावसकरनं लिहिले, ‘डेव्हिड हुक्सच्या दुर्घटनेवरून ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी बोध घ्यायला हवा की आपण मैदानावर वागतो तसे बाहेर वागलो तर काय होतं ते.’

गावसकरचे सार्थ उद्गार माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार ऍलन बॉर्डर याला चांगलेच झोंबले.
‘‘सुनील गावसकरनं यात डेव्हिड हुक्सला ओढण्याचं काही कारण नव्हते.’’

का कारण नव्हते? गावसकरला म्हणायचं होतं की, राडा करणे, गुंडाला शोभेसं वर्तन करणे ही ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंची उपजत प्रवृत्ती आहे. प्रतिपक्षाचे खेळाडू सुसंस्कृत असल्यामुळे मैदानावर डेव्हिड हुक्ससारखा प्रकार पाहायला मिळत नाही एवढंच. डेनिस लिलीनं बंपर्सप्रमाणे अपशब्दांचा भरपूर वापर केल्यावर माजी रिक्षावाला (व आजी दाऊद इब्राहिमचा व्याही) जावेद मियाँदाद बॅट उगारून लिलीवर धावून गेला होता. वेळीच अंपायर मध्ये पडले नसते तर लिलीचा भरमैदानावर हुक्स झाला असता. जावेदला इथं कराचीत बसलं काय अन् तुरुंगात बसलं काय सारखंच, शेवटी कुठंही बोबडंच बोलायचंय.

माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकेल क्लार्क आज शिष्टासारखा टीव्हीच्या ‘कॉमेंटेटर्स बॉक्स’मध्ये बसतो व सुरेख, समंजस व खुसखुशीत बोलतो. पण एकेकाळी (स्लिपमध्ये उभं राहून) संघाचा शिव्यांचा ऑर्केस्ट्रा चालविणारा तो प्रमुख शिवराळ होता अन् या लोकांना यात भूषण वाटतं. प्रतिपक्षाच्या फलंदाजांना टोचून टोचून बोलून बाद करणे हा त्यांना एक सनदशीर मार्ग वाटतो. नवोदित स्ट्राइनोस व हॅण्डसकोंबही आपल्या देशात येऊन आपल्या फलंदाजांना काहीबाही सुनावताना आपण डोळ्यांनी बघतो? कुठून येतो हा अगोचरपणा? क्रिकेट खेळायला आलायत तर क्रिकेट खेळा की. तोंडपाटीलकी कशाला करता? क्लार्ककडे बघून त्यांची हिंमत वाढते का? खरं म्हणजे कायद्यानं या गोष्टीला आळा घातला गेला. कारण हे वाढतच चाललंय. याला ते गमतीनं चिडवणं (banter) म्हणतात. तुम्ही चिडवाचिडवीचा खेळ खेळायला येता होय, आम्हाला वाटतं क्रिकेट खेळायला येता. याचीच पुढची पायरी म्हणजे ‘हुक्स प्रकरण’. ते मैदानाबाहेर झालं, आता मैदानावर होणं फारसं लांब नाही.

इंग्लंडचा कसोटी उपकर्णधार बेन स्टोक्स असाच ‘नाइट क्लब’बाहेरील राड्यात सापडला. त्याला एक दिवस पोलीस कोठडीतही काढावा लागला. इंग्लिश क्रिकेट मंडळानं या प्रकाराकडे दुर्लक्ष करून स्टोक्सची ऑस्ट्रेलियात ‘अॅशेस’साठी खेळणाऱ्या संघात निवड केली. हे धक्कादायक होतं. स्टोक्सच्या गैरवर्तणुकीला क्रिकेट मंडळानं नजरअंदाज करावं ही चांगली चिन्हे नव्हती. भावी अधोगतीला मंडळानं दिलेली ही मूक संमती होती. पण प्रकरण चिघळलं व मंडळाला गप्प बसणं अशक्य झालं. ‘पुढील नोटीस येईपर्यंत स्टोक्सचा संघात समावेश केला जाऊ नये’ असा त्यांनी फतवा काढला. वा रे उपकर्णधार! या स्टोक्सला गतसाली आयपीएलमध्ये सर्वाधिक बोली लावून खरीदण्यात आले होते.

इंग्लंडमध्ये क्रिकेटची सुरुवात झाली तेव्हा व पुढेही बरीच वर्षे क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ म्हणून ओळखला जात होता. आजही तसंच आहे, फक्त सभ्यतेची व्याख्या आमूलाग्र बदलली आहे.

गोऱ्या लोकांच्या या ‘गमतीनं चिडवण्या’ची व्याप्ती दाखविणारा हा किस्सा वाचा.

इंग्लंडचा बॉथम फलंदाजी करीत होता. ऑस्ट्रेलियाचा मार्श यष्टीमागे होता. बॉथमला गमतीनं चिडवण्यासाठी (व त्याला वेडावाकडा फटका मारण्यासाठी प्रवृत्त करायला) मार्श म्हणाला, ‘‘काय म्हणत्येय तुझी बायको व माझी मुलं?’’

‘‘बायको बरी आहे.’’ बॉथम उत्तरला, ‘‘पण तुझी मुलं मतिमंद आहेत.’’

जवाब सडेतोड असेलही, पण हे सगळं बोलणं म्हणजे गमतीदार चिडवणं?

[email protected]