‘युवी’ बिरादरी!

8

द्वारकानाथ संझगिरी  << [email protected] >>

दोन डावखुऱ्या फलंदाजांनी काल मनाला चटका लावला. एक युवराज, दुसरा शिखर धवन. एक निवृत्त झाला. दुसरा या विश्वचषकाच्या बाहेर फेकला जाण्याची भीती निर्माण झाली. युवराजची निवृत्ती जवळ आलीय हे जाणवत होतं; पण तो क्षण प्रत्यक्षात आला की डोळे ओले होतात. त्याची आणि माझी मैदानाबाहेर मैत्री नव्हती, पण मैदानावरचं नातं घट्ट होतं. ते घट्ट व्हायची अनेक कारणं आहेत. एक म्हणजे तो मॅचविनर होता. खरं तर वर्ल्ड कप विनर असं म्हणू या. 2007 साली वेस्ट इंडीजमधल्या विश्व चषकात भारतीय संघाची अब्रू गेली. 2007चा टी-20 विश्व चषक जिंकून धोनीच्या संघाने गेलेली निदान थोडी अबू मिळवली. त्यात युवराजचा वाटा मोठा होता. 2011 साली तर त्याने थेट विश्व चषकात मध्यवर्ती भूमिका निभावली. डावखुऱ्या गोलंदाजीने विकेट्स काढल्या. आणि फलंदाजीसाठी तर तो ‘कमांडो’ होता. त्याची बॅट जीव धोक्यात घालून जिंकून द्यायची. वन डेतला तो महान फलंदाज होता. सेहवान, सचिन, धोनी त्याआधी गांगुली, द्रविड असताना त्याच्याकडे आग विझवणाऱ्या आगीच्या बंबांची भूमिका येणे हा त्याचा बहुमान होता. त्यातच त्याचं मोठेपण दिसतं.

दुसरं कारण म्हणजे, त्याची फलंदाजी पाहणं हा निव्वळ कलात्मक आनंद होता. विविध म्युझियम्समधून रवी वर्माची पेंटिंग पाहताना मिळतो तसा. दुर्दैवाने युवराजच्या खेळी पेंटिंगप्रमाणे फ्रेम करून म्युझियममध्ये भिंतीवर लटकवता येत नाही, पण माझ्या मनाच्या म्युझियममध्ये ती आजन्म राहणार. 2002 साली लॉर्डस्वर युवराजने एक अजरामर खेळी करून भारताला 325 धावांचा यशस्वी पाठलाग करून दिला. त्यावेळी असा पाठलाग म्हणजे क्रिकेटमधील युरी गागरीनची अवकाश फेरी होती. गांगुलीने शर्ट काढून फिरवला तीच मॅच. मला लॉर्डस्वर एक केस पिकलेला, शेकडो मॅचेस कोळून प्यालेला, क्रिकेटवेडा भेटला. इंग्लंड हरली होती, पण तो युवराजच्या खेळीने सद्गदित  झाला होता. लॉर्डस्च्या बाजूच्या पबमध्ये माझ्या वाइनच्या ग्लासाला ग्लास भिडवत तो म्हणाला, ‘‘आज मी फ्रॅन्क वुलीला पुन्हा जन्म घेतलेला पाहिला. फ्रॅन्क वुली हा इंग्लंडचा एकेकाळचा अत्यंत महान, शैलीदार डावखुरा फलंदाज. ज्या माणसाने नील हार्वे, गॅरी सोबर्स, डेव्हिड गावर, ब्रायन लारा पाहिले होते, त्याला युवराजची खेळी पाहून ‘फ्रॅन्क वुली’ आठवावा. यात युवराजच्या फलंदाजीतल्या कलात्मक बाजूचं मोठेपण आलं. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं, ‘‘High backlift and flourishing  follow through is hall market a great player” युवराजची बॅकलिफ्ट आणि फॉलो थ्रू तसा होता. त्यामुळे तो फटका मारायचा नाही. फटका त्याच्या बॅटमध्ये उगम घेऊन वाहायचा. धावा, विक्रम, यश यापलीकडे म्हणून युवराजची खेळी आपल्याला घेऊन जायची.

तिसरं कारण म्हणजे, त्याने हिंदुस्थानी संघात एक प्रकारचा उद्दामपणा आणला. ‘नेमस्त’ हिंदुस्थानी क्रिकेट त्याने ‘जहाल’ केले. ती काळाजी गरज होती. आणि तो उद्दामपणा त्याच्या फलंदाजीत दिसायचा तसा त्याच्या जागतिक दर्जाच्या क्षेत्ररक्षणात दिसायचा. पॉइंटसारख्या महत्त्वाच्या क्षेत्ररक्षणाच्या जागेवर तो धावता बुरुज बनायचा. कितीतरी सणसणीत स्क्वेअर कट्स आणि स्क्वेअर ड्राइव्हज् त्याच्या दोन पंजांनी गिळून टाकल्या आहेत.

त्याच्या कर्तृत्वाला साजेसा शेवट करायची संधी बोर्डाने त्याला द्यायला हवी होती. तुम्ही नेहराला दिलीत. त्याला का नाही? धावासाठी हात पसरवायची सवय त्याच्या बॅटलाही नव्हती आणि सन्मानासाठी हात पसरवायची वृत्ती त्याचीही नसावी. कसोटी क्रिकेटमध्ये तो यशस्वी ठरला नाही त्याला अनेक कारणं आहेत. त्याचा ऊापोह मी इथे करत नाही. गंभीर आजारलाही उद्दामपणे बाजूला सारून नव्याने आयुष्य सुरू करणाऱ्या ‘युवी’ला माझा हा लेखन सलाम!

शिखर धवन हा तसा युवराजच्या डावखुऱ्या बिरादरीतला. अर्थात युवराजचं सौंदर्य त्याच्या फलंदाजीत नाही. युवराजची फलंदाजी सायराबानू असेल, तर धवनची फलंदाजी माला सिन्हा आहे. धवनच्या फलंदाजीत थरार आहे, आक्रमकता आहे, उद्दामपणा आहे. युवराजच्या चेहऱ्यावरही उद्दामपणा होता. धवनच्या तो बॅटमध्ये आहे. धवनला गब्बर म्हणतात. पण गब्बरचं क्रौर्य त्याच्या चेहऱ्यावर किंवा त्याच्या शारीरिक हालचालीतही नाही. झेल घेतल्यावर त्याचं मांडी थोपटणं हे फार आक्रमक वगैरे नसतं. असो, पण धवन जायबंदी होणे, त्याच्या अंगठय़ाची दुखापत गंभीर होणे ही हिंदुस्थानी संघाच्या दृष्टीने निराशाजनक गोष्ट आहे. धवनची फलंदाजी म्हणजे मूर्तिमंत सातत्य नव्हे, पण तो फॉर्मातला फलंदाज आहे. परवाच्या त्याच्या शतकी खेळीत त्याने एक वेगळी प्रगल्भता दाखवली. गब्बरचं रूप घ्यायच्या आधी त्याने पहिली काही षटकं ‘सांभा’ होणं पसंत केलं. सेट झालेला आणि फॉर्मातला धवन धुमाकूळ घालू शकतो. तो मोठी खेळी खेळू शकतो. मुख्य म्हणजे, त्याच्याकडे मोठय़ा सामन्याचं टेंपरामेंट आहे. मोठय़ा रंगमंचावर त्याचा खेळ फुलतो. आणि आता पुढे रंगमंच मोठे होत जाणार. हिंदुस्थानसाठी पाकिस्तानविरुद्धची मॅच हा फार मोठा रंगमंच आहे. आज तिथलं हवामान पाहिलं तर तिथे 40 टक्के पावसाची शक्यता आहे. अशा वेळी मॅच झाली तर ‘डकवर्थ-लुईस’ हे सद्गृहस्थ मॅच ताब्यात घेतात. सगळय़ात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्याचा अनुभव हा महत्त्वाचा आहे. हा लेख लिहीत असताना धवनला लिड्सला एका तज्ञ डॉक्टरांकडे नेण्यात आलंय. त्याच्या बोटाला हेअर लाइन फ्रॅक्चर आहे अशी बातमी आहे. पुढची बरी वाईट बातमी अजून आलेली नाही. कुल्टर नाईलच्या चेंडूने हिंदुस्थानविरुद्ध घेतलेली फार मोठी विकेट आहे. त्याची नोंद स्कोअर बुकात नाही, पण त्याचे परिणाम हिंदुस्थानला या विश्व चषकात भोगावे लागणार.

आता पुढे काय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या क्षणी मिळालेल्या बातमीतून धवन पुढे तीन आठवडे खेळू शकत नाही. कारण तो आघाडीचा फलंदाज आहे. मग मधल्या फळीसाठी विजय शंकर किंवा कार्तिक यांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल. पण जर धवन या स्पर्धेबाहेर फेकला जायची भीती निर्माण झाली तर त्याची जागा कोण घेणार, हा प्रश्न निर्माण होईल. अर्थात रिषभ पंत त्याची जागा घेईल असं म्हटलं जातं. कारण त्याला मुळात वगळल्यामुळे खूप मोठा वादंग निर्माण झाला होता. इथे काउंटीत श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे आणि गरज पडली तर पुजारा आहे. पुढचे भारताचे सामने नॉटिंगहॅम, मँचेस्टर, बर्मिंगहॅम, लिड्सला आहेत. अपवाद अफगाणिस्तानचा तिथे चेंडू स्विंग व्हायची शक्यता जास्त आहे. अनुभवी आणि चांगला स्विंग खेळू शकणारा फलंदाज आपल्याला हवा.

मग करायचं काय? कुणी रहाणे घ्या म्हणेल, कुणी पुजारासुद्धा. यापूर्वी संघात किंवा राखीव खेळाडू नसलेल्या खेळाडूला बोलावून त्याला संघात घेण्याची घटना माझ्या डोळय़ासमोर 1986 साली घडली होती. कौंटी नाही, तर चक्क लिगमध्ये खेळणाऱ्या मदनलालला कपिलदेवने लिड्स कसोटीसाठी बोलावले. लक्षात घ्या, कुणीही जायबंदी नव्हतं. ती कसोटी हिंदुस्थानने जिंकली. मदनलालचा परफॉर्मन्स झाला. त्यामुळे फारसा वादंग झाला नाही, पण मनोज प्रभाकरच्या अहंकाराला झालेली जखम कधीच बरी झाली नाही. कारण त्याची संधी हुकली. तुम्ही एकदा राखीव खेळाडू निवडले की त्यातला खेळाडू आणीबाणीत निवडला जायला हवा. ती बोर्डाची नैतिक जबाबदारी आहे. नाहीतर मग अशा निवडीला काय अर्थ?

त्यामुळे जर धवनला परत जायलाच लागलं आणि त्या जागी बदली खेळाडू पाठवावाच लागला तर दोन चॉइस उरतात. रायडू आणि रिषभ पंत. अनुभवी आणि झंझावात. काय करावं? वेळ आली की पूल ओलांडू.

आपली प्रतिक्रिया द्या