स्मृती मंधानाच्या शिरपेचात मानाचा तुरा, शिवछत्रपती पुरस्काराने होणार सन्मान

3

सामना प्रतिनिधी । मुंबई

हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाची उप-कर्णधार आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे नाव उज्वल करणाऱ्या स्मृती मंधानाच्या कामगिरीची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली आहे. 2017-18 च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली असून, स्मृतीचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप असणार आहे. 17 फेब्रुवारीला राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंचा सन्मान केला जाणार आहे.

न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिकेत स्मृतीने आपल्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. तिन्ही लढतींत स्मृतीने हिंदुस्थानी डावाची धुरा आपल्या खांद्यांवर समर्थपणे वाहत आपली भूमिका चोख बजावली. मात्र अन्य सहकाऱ्यांकडून झालेल्या निराशाजनक कामगिरीमुळे हिंदुस्थानी महिला संघ मालिकेत एकही सामना जिंकू शकला नाही. तरीही स्मृतीने केलेल्या कामगिरीचं फळ तिला मिळालं. आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत स्मृती सर्वोत्तम 3 फलंदाजांमध्ये आली. या बहुमानानंतर राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे स्मृतीचा आनंद अधिकच द्विगुणीत होणार आहे.

उदय देशपांडे यांना जीवन गौरव, गिर्यारोहक प्रियांकाचाही होणार गौरव
महाराष्ट्राच्या एकूण 88 खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून, मल्लखांबाला आंतरराष्ट्रीय पातळीवर यशोशिखरावर नेणारे आणि ओळख मिळवून देणारे उदय देशपांडे यांना जीवन गौरव तर माऊंट एव्हरेस्ट, किलीमांजरो सारखी शिखरे सर करणाऱ्या प्रियंका मोहितेला साहसी क्रीडा पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.