‘फायटर’ युवराजची निवृत्ती,  कॅन्सरग्रस्तांच्या सेवेसाठी आयुष्य खर्च करणार

71

सामना ( क्री.प्र ) । मुंबई

टीम इंडियाचा ‘सिक्सर किंग’ म्हणून ओळखला जाणारा डावखुरा धडाकेबाज फलंदाज, चपळ क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज युवराज सिंगने सोमवारी मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलातील पत्रकार परिषदेत 17 वर्षांच्या आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतून निवृत्ती जाहीर केली. कर्करोगावर मात करीत क्रिकेट मैदानात जिगरबाज पुनरागमन करणारा युवी आपल्या निवृत्तीच्या घोषणेवेळी अतिशय भावुक झाला होता. क्रिकेटचा निरोप घेऊन यापुढील आपले जीवन कॅन्सरग्रस्तांच्या सेवेला वाहणार असल्याची घोषणा निवृत्तीवेळी त्याने केली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या वादळी कारकीर्दीत युवराजने 40 कसोटी आणि 304 आंतरराष्ट्रीय वन डे लढतीत देशाचे प्रतिनिधित्व केले. टीम इंडियाला टी-20 विश्वचषक आणि 2011 चे दुसरे विश्वविजेतेपद मिळवून देण्यात युवराजने सिंहाचा वाटा उचलला होता. क्रिकेट हा युवराजचा जणू आत्माच होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेताना त्याचे डोळे पाणावले होते, पण निवृत्ती कधी घ्यायची हे खेळाडूला स्वतःला कळायला हवे, असे सांगत 37 वर्षीय युवराजने जड अंतःकरणाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला. आपण स्थानिक क्रिकेट लीगमध्ये मात्र खेळणार असल्याचे त्याने जाहीर केले.

गेल्या दोन वर्षांपासून युवराज हिंदुस्थानी संघात स्थान मिळवण्यासाठी झगडत होता, पण त्याला संधी मिळाली नाही. नुकत्याच झालेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतही त्याला फारशी चमक दाखवता आली नव्हती. त्यामुळं निवृत्तीचा विचार त्याच्या मनात घोळत होता.

‘हिंदुस्थानी संघात परतण्यासाठी खूप प्रयत्न केले होते, पण त्यात यश मिळालं नाही. त्यामुळं हीच थांबण्याची योग्य वेळ आहे, असं मला वाटलं. खेळाच्या मैदानावर आणि मैदानाबाहेरही सहकार्य करणार्‍या सर्वांचे आभार. क्रिकेटनं मला खूप मित्र दिले. या सर्वांचा मी ऋणी आहे. –  युवराज सिंग,  टीम इंडियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू

सहा चेंडूंत सहा षटकार

2007 च्या दक्षिण आफ्रिकेतील टी-20 विश्वचषकात दर्बनच्या लढतीत इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या 6 चेंडूंत 6 षटकांर ठोकत युवराजने सिक्सर किंग उपाधी मिळवली. 2007 चा टी -20 विश्वचषक आणि 2011चा आयसीसी विश्वचषक हिंदुस्थानला जिंकून देण्यात मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत युवराजच्या अष्टपैलू कामगिरीचाही सिंहाचा वाटा होता.

बीसीसीआयकडून मेहेरबानीची अपेक्षा ठेवली नाही

सचिन तेंडुलकर ज्या प्रकारे शेवटचा सामना मुंबईच्या मैदानावर खेळला, त्याप्रमाणे तुला शेवटचा सामना स्वतःच्या आवडत्या मैदानावर खेळावासा वाटला नाही का? किंवा तू बीसीसीआयला याबाबतची विनंती केली नाहीस का, असा प्रश्न युवराजला विचारण्यात आला असता युवराज म्हणाला , मला अशा पद्धतीचे क्रिकेट आवडत नाही. मी कधीच कोणाकडे माझ्या निरोपाचा सामना खेळण्याचा हट्ट धरला नाही. मी यो-यो टेस्ट पास झालो नाही तर मला निरोपाचा सामना खेळायला मिळेल आणि त्यानंतर मला निवृत्त व्हावे लागेल, असे मला सांगण्यात आले होते. पण मला त्या पद्धतीचा निरोप कधीही नको होता. त्यामुळे मी स्पष्टपणे सांगितले की, जर मी यो-यो टेस्ट पास झालो नाही तर मला कोणीही इतर लोकं सांगण्याआधी मी स्वतःहून घरी निघून जाईन आणि निवृत्ती स्वीकारेन, पण कुणाच्या मेहेरबानीची अपेक्षा ठेवणार नाही.

युवराजच्या कामगिरीवर दृष्टिक्षेप

कसोटी               लढती         धावा सरासरी

(2003 -2012 )        40         1900   33.9

वन डे

(2000 -2017 )        304       8701   36.5

टी-20

(2007-2017 )         58         1117   28.5

आपली प्रतिक्रिया द्या