लीलावतीतील एमआरआय फोटोशूटप्रकरणी गुन्हा दाखल

लीलावती रुग्णालयात एमआरआय करताना खासदार नवनीत राणा यांचा फोटो व्हायरल झाला होता. याप्रकरणी लीलावती रुग्णालयाच्या वतीने आज वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, तपासासाठी वांद्रे पोलिसांनी एमआरआय कक्षातील सीसीटीव्ही ताब्यात घेतले असून एमआरआय करताना उपस्थित असलेल्यांची चौकशी केली जाणार आहे.

मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी अटक आणि त्यानंतर 14 दिवसांनी सुटका झाल्यानंतर नवनीत राणा लीलावतीत अॅडमिट झाल्या होत्या. वैद्यकीय चाचण्यांनंतर त्यांचा एमआरआय काढण्याचा निर्णय घेतला. मात्र, एमआरआय काढताना पती रवी राणा, एक सुरक्षारक्षक आणि पांढरा शर्ट घातलेली एक व्यक्ती होती. पांढरा शर्ट घातलेल्या व्यक्तीने कोणत्याही परवानगीशिवाय राणांचा एमआरआय मशीन ट्रॉलीवरचा फोटो काढला. रुग्णालय नियमांचे उल्लंघन करणाऱया या व्यक्तीविरोधात लीलावतीच्या सुरक्षा अधिकाऱयाने आज वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.