नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ४ ठिकाणी ७ गाड्यांची तोडफोड

सामना प्रतिनिधी । पुणे

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पहाटेच्या वेळी बिबवेवाडी, मार्केटयार्ड, शिवणे, दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सात गाड्यांची तोडफोड झाली. यामध्ये सहा चारचाकी आणि एका रिक्षाचे नुकसान झाले आहे. शिवणे येथील तोडफोड प्रकरणी एकाला अटक केली. बिबवेवाडी, मार्केयार्ड येथे मध्यधुंद टोळक्यांनी कोयत्याने वार करून गाड्यांच्या काचा फोडल्या. गेल्या काही दिवसांपासून गाड्या फोडल्याचे सुरू झालेले सत्र नवीन वर्षातही सुरू ठेऊन गुन्हेगारांनी पोलिसांना आव्हान दिले आहे.

प्रताप धोंडीबा शिळीमकर (वय ४७, रा. बिबवेवाडी) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. प्रताप शिळीमकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत. विविध ठिकाणांच्या कामांचा ते ठेका घेतात. बिबवेवाडी गावठाणात प्रेमवर्षा अपार्टमेंट येथे घरसमोर शिळीमकर यांची फॉच्र्युनर आणि त्यांचे शेजारी बहाऊद्दीन शमशुद्दीन अन्सारी यांची होंडासीटी या गाड्या लावल्या होत्या. पहाटे २ ते ४ या वेळेत दारू पिऊन आलेल्या काही जणांनी कोयत्याने वार करून गाड्यांच्या समोरच्या, बाजूच्या खिडक्या आणि मागच्या काचा फोडून पळून गेले, असे वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी सांगितले.

मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आनंदनगर येथे एक रिक्षा आणि इस्टीम कारची काच फोडल्याची घटना पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. परंतू, अद्याप तोडफोड करणाऱ्यांचा सुगावा लागलेला नाही. दत्तवाडी येथे वालेकर नावाच्या व्यक्तीच्या गाडीची काच फुटल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला. मात्र, ही तोडफोड कोणी केली की अन्य कारणाने फुटली याचा तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत. याप्रकरणी अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे.

शिवणे येथे मुख्य बसथांबा येथे रात्री काही टोळक्यांची एकमेकांकडे बघण्यावरून भांडणे झाली. यामध्ये एकाचा कारची दगड मारून काच फोडण्यात आली आहे. याप्रकरणी अभिषेक विकास लोणारे याला उत्तमनगर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला.

नववर्षाचे स्वागत करताना कोणतीही अनुचूत घटना घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. विशेषत: रात्री १२ नंतरच गुन्हे घडण्याची शक्यता असल्याने पोलिसांना गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले होते. तरीही बिबवेवाडी, मार्केटयार्ड, शिवणे, दत्तवाडी भागात घटना घडल्याने गुन्हेगारांनी पोलिसांना नववर्षाच्या पहिल्याच दिवसाला आव्हान दिले आहे.