झाकीर नाईक आणि त्याच्या संस्थेविरुद्ध ‘ईडी’चा गुन्हा

हवालामार्फत कोट्यवधीचा झोल

मुंबई – वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईक आणि त्याची संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी ‘ईडी’ने गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) पाठोपाठ आता ‘ईडी’नेदेखील गुन्हा दाखल केल्यामुळे झाकीर नाईकच्या अडचणीत वाढ झाली आहे.

इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनला देशाबाहेरून कोट्यवधी रुपयांचा निधी येतो. हा निधी हवालामार्फत पुन्हा परदेशात पाठवला जातो, असा आरोप झाकीरवर आहे. त्यानुसार ईडीच्या अधिकार्‍यांनी संस्थेच्या काही बँक व्यवहारांची पडताळणी केली. या प्राथमिक चौकशीवरून पुढील चौकशीसाठी लवकरच ईडीमार्फत इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनला समन्स जारी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

झाकीर नाईक सध्या सौदीत असल्याने एनआयएने गुन्हा दाखल केल्यानंतर संस्थेशी संबंधित कर्मचारी आणि अधिकार्‍यांच्या घरावर तसेच कार्यालयात छापे टाकले. दोन धर्मांत तेढ निर्माण करणे, जिहादसाठी तरुणांची माथी भडकावण्याचे काम करीत असल्याचा झाकीर आणि त्याच्या संस्थेवर ठपका आहे. याआधी झाकीर आणि त्याच्या संस्थेबाबत मुंबई पोलिसांनी गोपनीय अहवाल सादर केल्यानंतर केंद्र सरकारने इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर पाच वर्षांची बंदी लादली. एकापाठोपठ दाखल झालेले गुन्हे सिद्ध झाल्यास ही बंदी कायम राहू शकते, असेही एका अधिकार्‍याने सांगितले.
चारही बाजूने नाकाबंदी

बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यासाठी झाकीरच्या भाषणातून प्रेरीत झाल्याचे एका दहशतवाद्याने चौकशीत सांगितल्यानंतर झाकीर आणि त्याची संस्या प्रकाश झोतात आली. आपण निर्दोष असल्याचे झाकीरने स्काइपवरून दिलेल्या मुलाखतीमधून सांगितले. मात्र आधी मुंबई पोलीस आणि एटीएस, त्यानंतर एनआयए आणि आता ईडीचाही ससेमिरा मागे लागल्याने झाकीर आणि इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनची चारही बाजूने नाकाबंदी झाली आहे.

– See more at: http://www.saamana.com/mumbai/zakir-naik-ani-tyachya-sansthevirudhha-edcha-gunha#sthash.pajL02Ar.dpuf