सराईत गुन्हेगाराचा आत्महत्येचा प्रयत्न

सामना प्रतिनिधी । पुणे

अमली पदार्थाच्या आधीन गेलेला सराईत गुन्हेगार कोयता घेऊन दहशत पसरवत असल्याने त्याला पकडण्यासाठी पोलीस गेल्यानंतर त्याने स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तो १० ते १५ टक्के भाजला असून, उपचार सुरू आहेत.

फैजल ऊर्फ सोन्या रफिक नदाफ असे या गुन्हेगाराचे नाव आहे. पोलीस शिपाई महेंद्र रानगट यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. फैजल याच्यावर घरफोडी, जबरी चोरी, दरोड्याचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो दारू, ब्राऊनशुगर यांसह व्हाईटनर, सुलोचन यासारख्या अमली पदार्थाच्या आहारी गेला आहे. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास तो कोयता घेऊन लोहियानगर येथे दहशत पसरवत होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस त्याला पकडायला गेले. त्यांच्या भीतीने त्याने स्वत:ला पेटवून घेतले. पोलीस आणि नागरिकांनी आग आटोक्यात आणली. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

‘मुंडी फुटबॉल’मध्ये सहभागी
सुमारे १५ वर्षांपूर्वी कोंढव्यात एकाचा खून झाला होता. त्या प्रकरणात अब्दुल गनी खानसह फैयाजही सहभागी होता. खून केल्यानंतर त्यांनी मुंडक्यासोबत फुटबॉल खेळला होता. फैजल तेव्हा अल्पवयीन असल्याने त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. त्यानंतरही त्याने अनेक गुन्हे केले आहेत, असे खडक पोलिसांनी सांगितले.