मृत्यूचा तमाशा! हजारो नागरिकांसमोर आरोपींना गोळ्या घातल्या

सामना ऑनलाईन । बीजिंग

लोकांच्या मनात अपराध करण्याचा विचार येऊ नये यासाठी जगभरात आरोपींना शिक्षा देण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात. मात्र चीनमध्ये माणुसकीला काळीमा फासत अतिशय क्रूरपणे शिक्षा देण्यात येते.

चीनमध्ये शनिवारी मृत्यूची शिक्षा झालेल्या दहा आरोपींना एका मैदानात नेऊन खुलेआम गोळ्या घालण्यात आल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या शिक्षेविरोधात अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. चीनमधील प्रसारमाध्यमांनीही याला विरोध केला आहे.

शनिवारी मृत्यूची शिक्षा देण्यात आलेल्या १० आरोपींना पोलिसांच्या गाडीतून प्रेक्षकांनी भरलेल्या मैदानात आणण्यात आले. नागरिकांनी आरोपींना गोळ्या घालताना पाहावे यासाठी नोटीस जारी करून त्यांना मैदानात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. हा सर्व प्रकार ग्वांगडोंग प्रांतातील ल्यूफेंग भागात घडला. गोळ्या घालण्यात आलेल्या १० आरोपींपैकी सात जण अमली पदार्थांचे तस्कर होते, तर अन्य तीन जणांवर हत्या आणि चोरीचा आरोप होता.