व्हेनेझुएला कोसळलेली अर्थव्यवस्था आणि सैरभैर नागरिक

>> सनत कोल्हटकर

२०१४ नंतर क्रूड तेलाचे भाव कोसळले आणि त्याचा फटका व्हेनेझुएला सारख्या देशाला बसत या देशाची ‘दिवाळखोरीकडे’ वेगाने वाटचाल सुरू झाली.

साल २०१४ नंतर क्रूड तेलाचे जागतिक भाव कोसळल्यानंतर ज्या देशांची आर्थिक अधोगती वेगाने सुरू झाली त्यामध्ये व्हेनेझुएलाचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. या दक्षिण अमेरिकेतील देशाकडे क्रूड तेलाचे भरपूर साठे आहेत. व्हेनेझुएलाची लोकसंख्या तीन कोटी आहे. या देशाचे नेतृत्व पूर्वी ‘चावेज’ यांच्याकडे अनेक वर्षे होते. दुर्दैवाने त्यांच्या व्हेनेझुएलातील कारकीर्दीत त्या देशाचे नवनवीन आर्थिक स्रोत ( शेती, पर्यटन, फलोत्पादन व इतर) शोधण्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले असेच म्हणावे लागेल. त्या देशाची ९० टक्के अर्थव्यवस्था क्रूड तेलाच्या उत्पन्नावरच अवलंबून होती.

साल २०१४ मध्ये अमेरिकेत क्रूड तेलाचे प्रचंड साठे सापडले व त्यासाठी अमेरिकेने क्रूड तेल उत्खननासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे पारंपरिक उत्खनन पद्धतीपेक्षा कमी खर्चात तेल उत्खनन सुरू झाले. त्यानंतर अमेरिकेने टप्प्याटप्प्याने सौदी व इतर आखाती देशांकडून क्रूड तेल विकत घेणे बंदच केले. इतकी वर्षे अमेरिका हाच क्रूड तेलाचा जगामधील सर्वात मोठा ग्राहक देश होता. त्यानेच क्रूड तेल विकत घेणे नुसते बंदच केले नाही तर स्वतःचे क्रूड तेल जागतिक बाजारात विक्रीसाठी आणले. त्यानंतर क्रूड तेलाचे साल २०१४ पूर्वी असणारे १३० डॉलर प्रति पिंप भाव कोसळत ३० डॉलर प्रति पिंपावर येऊन पोहोचले. या भावातून क्रूड तेलाच्या जागतिक कंपन्यांचा उत्पादन खर्चही निघेनासा झाला. या परिस्थितीत नजीकच्या काळात सुधारणा होण्याची लक्षणेही दिसत नव्हती. याचा मोठा फटका क्रूड तेल उत्पादनातील दादा देश सौदी अरेबिया, रशिया या देशांनाही बसला. मग या देशांनी ‘ओपेक’ या संघटनेमार्फत तेल उत्पादनावर नियंत्रण ठेवण्याचे तेल उत्पादकांना आवाहन करून प्रत्येक देशाला तेल उत्पादनाचा ‘कोटा’ ठरवून दिला. त्यामुळे तेलाचे भाव काही प्रमाणात वाढण्यास सुरुवात झालीही, परंतु या तेलाचे भाव कोसळलेल्या काळात व्हेनेझुएला, अझरबैजानसारखे देश तग धरू शकले नाहीत. या देशांची ‘दिवाळखोरीकडे’ वेगाने वाटचाल सुरू झाली. सुरुवातीला या देशांनी त्यांच्याकडे असलेला राखीव अर्थसाठाही हळूहळू वापरण्यास सुरुवात केली, परंतु या परिस्थितीमुळे अपरिहार्यपणे व्हेनेझुएलाच्या चलनाची (बोलिव्हिअर) जागतिक पत घसरण्यास वेगाने सुरुवात झाली. सहा महिन्यांपूर्वीच व्हेनेझुएला हा मोठय़ा आर्थिक दिवाळखोरीकडे वेगाने प्रवास करत असल्याचे स्पष्ट झाले होते.

व्हेनेझुएलाच्या अमेरिकेशी पूर्वीपासून फटकून राहण्याच्या सवयीमुळे अमेरिका व जागतिक अर्थसंस्थाही व्हेनेझुएलाला मदत करण्यास तयार झाल्या नाहीत. व्हेनेझुएलाचे अमेरिकेकडे असणारे ‘बॉण्ड्स’ही व्हेनेझुएलाने विकून त्यातून काही निधी उपलब्ध केला होता, परंतु जागतिक आर्थिक पत घसरल्यामुळे इतर देशांनीही व्हेनेझुएलाला मदत बंद केली. सहा महिन्यांपूर्वीपासूनच व्हेनेझुएलातील अनेक ‘मॉल्स’मधून जीवनावश्यक गोष्टी मिळेनाशा झाल्या. नंतर नंतर तर तेथील दवाखाने, रुग्णालयांमधून जीवनावश्यक औषधेही मिळेनाशी झाली. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तेथील सरकारने सामान्य नागरिकांचे पगारही दुप्पट केले, परंतु चलनाची पतच न राहिल्यामुळे ‘हातात’ पैसे तर आहेत, पण जीवनावश्यक वस्तूच बाजारात विक्रीस उपलब्ध नाहीत अशी एक ‘भयाण’ अवस्था सध्या व्हेनेझुएलामध्ये गेले वर्षभर आहे. बेरोजगारीचे तेथील प्रमाणही फार प्रचंड आहे.

अशा परिस्थितीत व्हेनेझुएलातील विरोधी पक्षांनी तेथील सरकारकडे याचा जाब मागितला व सत्तेतून दूर होण्यास सांगितले. यावर व्हेनेझुएलाचे सध्याचे अध्यक्ष ‘निकोलस मादुरो’ यांनी तेथील बहुतांश विरोधी पक्षनेत्यांना तुरुंगात डांबले. निकोलस मादुरो यांची आता हुकूमशाहीकडे वेगाने वाटचाल सुरू आल्याचे सांगितले जाते. व्हेनेझुएलामध्ये २० मे २०१८ रोजी अध्यक्षपदासाठी आणि इतर संसद सदस्यांची निवड होणार आहे. यापूर्वी ती एप्रिल होणार होती. मात्र अचानक ती पुढे ढकलली गेली. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तेथील सामान्य जनता शेजारील देशात म्हणजे ‘कोलंबिया’मध्ये सीमापार जाऊन बाजारहाट करू लागली. अनेक हजारो सामान्य व्हेनेझुएलाचे नागरिक सीमापार नोकरीच्या शोधात कोलंबियात गेले. त्यामुळे सध्या कोलंबिया या लोंढय़ांमुळे त्रस्त असून त्या देशाने जागतिक समूहाकडे आर्थिक मदतीची मागणी सुरू केली आहे. सुमारे पाच लाख व्हेनेझुएलन नागरिक आतापर्यंत कोलंबियात स्थलांतरित झाल्याचे बोलले जाते. कोलंबियातील रुग्णालयेही व्हेनेझुएलन रुग्णांनी भरून गेली आहेत. अनेक नागरिक कोलंबियातील सार्वजनिक बागांमध्ये राहत असल्याचे सांगितले जाते. संयुक्त राष्ट्रांतर्फे नुकतेच व्हेनेझुएला व कोलंबियाच्या सीमेवरील स्थलांतरितांसाठी तिसरे कार्यालय सुरू करण्यात आले. काही नागरिकांनी तर समुद्रमार्गे ब्राझीलमध्ये निर्वासित म्हणून प्रवेश मिळविला. अमेरिका वारंवार ‘निकोलस मादुरो’ याना सत्तेतून दूर होण्यास सांगत आहे. निकोलस सत्तेतून दूर झाल्यास अमेरिका व्हेनेझुएलाला मदत करू इच्छिते. त्यामुळे जोपर्यंत ‘निकोलस मादुरोस’ सत्तेतून दूर होत नाहीत तोपर्यंत व्हेनेझुएलाची स्थिती सुधारण्याची कोणतीही लक्षणे नाहीत.

खालील एक उदाहरण व्हेनेझुएलाची सध्याची स्थिती स्पष्ट करण्यास पुरेसे आहे. तेथील सरकार निर्धारित किमान मासिक वेतन ३० ते ३२ अमेरिकन डॉलर्स आहे, परंतु व्हेनेझुएलाच्या चलनाची पतच इतकी खाली आली आहे की, ३० डॉलर्सवरून ती आता ६ डॉलरवर आली आहे. म्हणजे जेवढे व्हेनेझुएलन ‘बोलिवर्स’ या डॉलर्स वर मिळायचे, तेवढेच आता सहा डॉलर्सच्या बदल्यात मिळतात. अशाही परिस्थितीत ‘निकोलस मादुरो’ यांनी मागील आठवडय़ात क्रूड तेलाच्या त्या देशातील साठय़ावर (पन्नास लाख पिंप) आधारित व तसेच त्या देशाकडे असणाऱया सोन्याच्या साठय़ावर आधारित व बिटकॉइनच्या धर्तीवर अशी दोन ‘आभासी चलने’ ( पेट्रो आणि पेट्रो गोल्ड ) बाजारात आणली. या चलनांबद्दल कुठेच बोलले जात नसून व्हेनेझुएलाचे अध्यक्षच आतापर्यंत काही लाख आभासी चलने विकली गेल्याचे सांगतात. व्हेनेझुएलाची ही आर्थिक घसरगुंडी व दुरवस्था फक्त तेथील सत्ताबदल झाल्यासच थांबू शकेल अशी तूर्त तरी लक्षणे दिसतात.

[email protected]