चटकदार शाकाहार

वेगवेगळ्या पावभाजी…थाय करी, ग्रीन थाय करी, रेड थाय करी अशा देशी-विदेशी जेवणाच्या व्हरायटी… घरी बनवलेले झणझणीत मसाले, चटण्या, सॉस… मिनरल वॉटरमध्ये तयार केलेले जेवण… आणि ‘अतिथी देवो भव’ या उक्तीप्रमाणे इथे आलेल्या अतिथीला ताजे आणि स्वच्छ अन्न मिळेल याबाबत जागरुक असलेले इथले कर्मचारी. हे हॉटेल म्हणजे वसईच्या रोशन नाईक या तरुणाने पार्टनरशिपमध्ये सुरू केलेले वसई येथील ‘टर्निंग पॉइंट प्युअर व्हेज हॉटेल’. त्याने अगदी थोडय़ा अवधीत खवय्यांची मने जिंकलीत.

रोशन नाईक आणि अमित शहा यांच्या भागीदारीमध्ये वसईत टर्निंग पॉइंट प्युअर व्हेज हॉटेल आज दिमाखात उभे आहे. नाईक हे अंधेरीच्या कोकीला बेन हॉस्पिटलमध्ये फूड मॅनेजर म्हणून कामाला होते. ते हॉटेल मॅनेजमेण्टसाठी ताजला होते. ताजला तीन वर्षे काम केल्यानंतर कार्निव्हल यूकेला वाईन सोम्युलिअर म्हणूनही त्यांनी काम पाहिले. पण त्या कामात त्यांचे मन रमेना, अखेर त्यांनी स्वतःचा व्यवसाय करायचा असा निर्णय घेतला आणि ते काम सोडले. तेव्हा असा विचार केला की हॉटेल तर अनेक आहेत, पण आपलं वेगळेपण जपायचं तर काहीतरी वेगळं करायला हवा. त्यादृष्टीने त्यांनी अभ्यास करून नावीन्यपूर्ण डिशेस आणल्या. ते सांगतात, हॉटेलमध्ये बनवल्या जाणाऱया कुठल्याच पदार्थांमध्ये रंग, फ्लेव्हर, इसेन्लस वापरले जात नाही. येथील चायनिज फूडमध्ये अजिनोमोटोचाही वापर केला जात नाही. इथे बनवले जाणारे सर्व जेवण मिनरल वॉटरमध्ये बनवले जाते. त्यासाठी मोठे वीस लिटरचे कॅन मागवले जातात. हॉटेलात  येणाऱया ग्राहकांना मिनरल वॉटर कॉम्लिमेण्टरी दिले जाते. फिल्टर वॉटर वा मिनरल वॉटर सर्व्ह करतो, असेही रोशन नाईक म्हणाले.

ब्लॅक पावभाजी इथली स्पेशलिटी. त्यासाठी घरगुती मसाल्याचा वापर केला जातो. नेहमीच्या पावभाजीपेक्षा ही पावभाजी थोडी वेगळी आणि टेस्टी लागते. तर ग्रीन पावभाजीमध्ये सगळ्या हिरव्या भाज्या असतात. याबरोबरच खडा पावभाजी, हरियाली पावभाजी, बनाना पावभाजी, टोमॅटो पावभाजी, पंजाबी पावभाजी, जैन पावभाजी अशा एकापेक्षा एक सात ते आठ प्रकारच्या पावभाज्या इथे चाखायला मिळतात. डिसेंबर २०१६ रोजी या हॉटेलाचा शुभारंभ केला आणि पुन्हा रिनोव्हेट करुन बाजूचा पण गाळा घेतला. हॉटेल सुरू झाले तेव्हा फक्त दोन टेबल होते आता सोळा टेबल्स झाली आहेत.

ज्युस पार्लर

लोकांना शीतपेये कधीही आवडतात. कधीही ते शीतपेये प्यायला वळतातच. म्हणूनच रोशन नाईक आता ज्युस पार्लर सुरू करणार आहेत. चांगले आणि आरोग्यदायी असे ज्युस असणार आहेत. हे ज्युस अन्य ठिकाणी कुठे मिळणार नाहीत असेच ज्युस ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.