नक्राश्रू

योगेश नगरदेवळेकर

दापोलीत पहिल्यांदाच समुद्रात मगर दिसली… पाहूया यानिमित्ताने मगरीविषयी…

कोणतीही भाषा समृद्ध होत जाते ती त्या भाषेत वापरलेल्या म्हणी आणि वाप्रचारांनी. परवा सहज वाचता वाचता ‘तो निगरगट्ट कसला रडतो, नक्राश्रू आहेत नुसते’ असं वाचलं. ‘नक्राश्रू’ या एका शब्दात त्या व्यक्तीचे स्वभावचित्र डोळय़ांसमोर उभे राहिले. ‘नक्र’ म्हणजे मगर. हिंदीमध्येसुद्धा ‘मगरमच्छ के आंसू’ असा शब्दप्रयोग आहे. साहेबांच्या भाषेत पण ‘क्रोकोडाईल टीअर्स’ असा शब्द आहे. या सगळय़ांचा अर्थ आपल्याकडून झालेल्या चुकीबद्दल खोटे अश्रू ढाळणे असाच आहे. मग याचा मगरीशी काय संबंध!

म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. मगर एखादं भक्ष्य खाते तेव्हा तिच्या डोळय़ांमधून पाणी येत राहतं हेच ते नक्राश्रू, पण या डोळय़ांतील पाण्याचा तिला वाईट वाटण्याशी काहीही संबंध नसतो. डोळय़ांतील रसायनाचा हवेशी संपर्क झाल्याने हे पाणी येत असतं.

मगर तसा दुर्लक्षित प्राणी म्हणायला हवा. त्याचा आढळ कमी असल्याने नेहमीच्या शिकारी प्राण्यांमध्ये त्याचं नाव चटकन घेतलं जात नाही. २४० दशलक्ष वर्षांपूर्वी पक्षी आणि डायनोसॉर यांच्याबरोबर उत्कांत झालेला हा प्राणी निसर्गाशी जुळवून घेण्याच्या क्षमतेमुळे टिकून राहिला आहे. मगर हा सरिसृप म्हणजे सरपटणाऱया वर्गातील प्राणी आहे. तो जमिनीवर तसेच पाण्यातही सहजतेने वावरतो म्हणून त्याला चुकून उभयचर समजले जाते. पावसाळय़ाच्या काळात मगरीचे मीलन होऊन मगर सुमारे २० ते ६० अंडी घालते आणि त्यांचे संरक्षण करते. निसर्गामध्ये अनेक आश्चर्यकारक गोष्टी दडलेल्या असतात. मगरीच्या या अंडय़ातून येणारे पिलू नर असेल की मादी हे चक्क त्या घरटय़ातील उबेच्या तापमानावरून ठरतं. घरटय़ाचे तापमान बरोबर ३१.६ अंश राखलं गेले असेल तर त्या अंडय़ांमधून फक्त नर मगरींची पिलं जन्माला येतात आणि हे तापमान यापेक्षा कमी किंवा जास्त असलं तरी फक्त मादी पिलं जन्माला येतात. या अंडय़ांतून जन्माला येणाऱया पिलांना जबडय़ाच्या पुढच्या टोकाला एक अंड-दंत उत्पन्न होतो. त्याच्या सहाय्याने ती अंडय़ाचे कवच फोडून बाहेर येतात. एवढी अंडी घातली जात असली तरी त्यातून पूर्ण वाढ होईपर्यंत मगरीचे  जगण्याचे प्रमाण फक्त एक टक्क्याइतकेच असते. या लहान पिलांना खूप शत्रू असतात. त्यामुळे जवळपास ९९ टक्के पिलं लहान असतानाच शत्रुमुखी पडतात.

मगरीने जबडा उघडला की, तिचे धारदार दात नजरेस पडतात. ते बघूनच धडकी भरते. या दातांचा उपयोग फक्त मांसाचे लचके तोडण्यासाठी होतो. आपल्या दाढा जशा अन्नाचे चावून बारीक भाग करतात तसं मगरीच्या तोंडात होत नाही. ती अख्खंच्या अख्खं मांस गिळून टाकते आणि या अन्नासोबतच ती दगडगोटे पण गिळते. हे दगडगोटे पोटात त्या मांसाचे ग्राइंड करून तुकडे करतात, जेणेकरून अन्न पचायला मदत होते. मगर पाण्याबाहेर जबडा उघडून बसलेली असेल तर घाबरण्याचं कारण नाही. ती तोंडावाटे हवा घेऊन शरीराचं तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असते.

खवल्या खवल्याने बनलेली तिची त्वचा अतिशय सुंदर दिसते. अर्थातच हे चांगलेपण तिच्या अस्तित्वाच्या मुळावर आलं आहे. या चामडय़ाला बॅग आणि पर्स बनवण्यासाठी प्रचंड मागणी आहे आणि त्यामुळे मगरींची अतोनात शिकार झाली. काही वर्षांत फक्त प्राणिसंग्रहालयातच हा प्राणी बघायला मिळेल का काय असे वाटते. महाराष्ट्रात काही नद्यांमध्ये, खाडय़ांमध्ये हे जीव कसेतरी तग धरून आहेत. यातलीच एक मागच्या आठवडय़ात दापोलीजवळ समुद्रात दिसली होती. मानवाप्रमाणेच या पृथ्वीवर राहण्याचा सर्व प्राण्यांना हक्क आहे हे मानव कधी शिकणार काय माहीत?