दिव्याच्या रेल्वे पुलावर ‘एल्फिन्स्टन’ घडणार होते, दक्ष प्रवाशामुळे दुर्घटना टळली

सामना प्रतिनिधी, ठाणे

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील जिन्यावर शुक्रवारी घडलेल्या काळय़ाकुट्ट घटनेच्या आठवणीने अजूनही अनेकांच्या अंगावर शहारे येतात. मात्र ८ सप्टेंबरच्या रात्रीदेखील दिवा स्थानकावर ‘एल्फिन्स्टन’ होऊन अशीच चेंगराचेंगरी होणार होती. मुसळधार पडणारा पाऊस… विजांचा कडकडाट आणि लोकलच्या गाड्यांमधून भरभरून उतरणारी चाकरमान्यांची गर्दी यामुळे दिवा स्थानकातील पूर्वेकडील जिना अक्षरशः ओव्हरपॅक झाला होता. मात्र काही दक्ष प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे गंभीर दुर्घटना टळली.

दिवा हे मध्य रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे जंक्शन असून तेथे आठ फलाट आहेत. फलाट क्रमांक ७ व ८ वर कोकणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या येतात. फलाट ५ व ६ वरून दिवा-वसई व दिवा-रोहा या गाड्या सुटतात, तर फलाट क्रमांक १ व २ आणि ३, ४ वरून लोकल गाड्या धावतात. दिव्याची लोकसंख्या साडेतीन ते चार लाख एवढी झाली असून रोज सुमारे एक लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे फलाटांवर सकाळ- संध्याकाळ प्रचंड गर्दी असते. ८ सप्टेंबरच्या रात्री ८ वाजता अचानकपणे विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस सुरू झाला. अप व डाऊन मार्गावरील लोकल एकाच वेळेला आल्याने प्रवाशांची तोबा गर्दी उसळली.

अचानक आलेल्या पावसामुळे कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांकडे छत्र्या नव्हत्या. त्यामुळे त्यांनी फलाट क्रमांक १ व २ वरील जिन्याचा आधार घेतला. पूर्वेकडे जोडणाऱ्या या पुलावरील जिना अतिशय अरुंद असल्याने गर्दी वाढत गेली आणि एकच गोंधळ सुरू झाला. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक गर्दीतच अडकून पडले. त्यातील काही जणांनी रेटारेटी सुरूही केली.

अनिलने मेसेज केला आणि पोलीस आले
परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती निर्माण झाल्याने याच गर्दीत अडकलेले प्रवासी अनिल भुवड यांनी दिवा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आदेश भगत यांना एसएमएस केला. दिव्याच्या पुलावर गर्दी झाली असून तातडीने पोलिसांना पाठवा, असा विनंतीवजा मेसेज केला. विशेष म्हणजे भगतदेखील त्यावेळी ऑनलाइन होते. हा मेसेज पाहताच त्यांनी आरपीएफच्या अधिकाऱ्यांना कळविले. पाच-दहा मिनिटांच्या आतच पोलीस हजर झाले व शिट्या वाजवून त्यांनी गर्दीवर नियंत्रण मिळविले.

एस्क्लेटर बसविणार, जिना रुंद करणार!
एल्फिन्स्टनची दुर्घटना घडल्यानंतर मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवरील पुलांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक दिवा स्थानकात दाखल झाले. रेल्वे प्रवासी व संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर फलाट क्रमांक १ व २ वर एस्क्लेटर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई दिशेकडील अरुंद जिना रुंद करणार असून कल्याण दिशेकडील फक्त पश्चिमेला जोडलेला पूल पूर्वेलादेखील जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गर्दीचे विभाजन होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मुंब्रा, कळवा, डोंबिवली, कोपर, ठाकुर्ली, ठाणे या स्थानकांचीदेखील रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.