तिरूपतीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात; तिघे जागीच ठार

सामना प्रतिनिधी । मुखेड

मुखेड तालुक्यातील वसुर तांडा येथील भाविकांचा देवदर्शनासाठी तिरुपतीला जाताना अपघात झाला आहे. क्रुझर गाडी पुलाच्या कठड्याला धडकून झालेल्या अपघातात तीन भाविक जागीच ठार झाले असून दहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर कडप्पा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवारी सकाळी कडप्पा ते कर्नुल दरम्यान कुमारपल्ली (आंध्रप्रदेश) येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुखेड तालुक्यातील वसुर तांडा येथील चव्हान व राठोड कुंटुबातील मंडळी क्रुझर जीप क्रं एम एच 38-एम-1512 या वाहनाने बुधवारी रात्री तिरुपती येथील बालाजीच्या दर्शनासाठी निघाले. या वाहनात मोठे स्त्रिया व पुरुष असे तेरा व्यक्ती व लहान ८ बालके असे एकूण २२ जण होते. सदरील वाहन कडप्पा ते कर्नुल या मार्गावरील कुमारपल्ली येथे आले असता वाहनाचा वेग जास्तीचा असल्याने वाहन चालकाचा ताबा सुटुन जीप पुलाच्या कठड्याला धडकली व पुलाखाली कोसळली. यात तीन जण जागीच ठार तर दहा जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये लक्ष्मण गणपत चव्हाण (60), गणेश उत्तम चव्हाण (12) व वाहन चालकाचा समावेश आहे.