भंगार वायरिंगमुळेच क्रिस्टल टॉवरमध्ये भडका

सामना ऑनलाईन । मुंबई

परळ येथे क्रिस्टल टॉवरमध्ये लागलेल्या आगीच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने आपला अहवाल आज आयुक्तांना सादर केला असून इमारतीमधील सदोष वायरिंगमुळेच आगीचा भडका उडाल्याचे स्पष्ट केले आहे. 22 ऑगस्ट रोजी लागलेल्या आगीत चार जणांना नाहक जीव गमवावा लागला होता तर 23 जण जखमीदेखील झाले होते.

अग्निशमन दलाच्या अधिकायांनी केलेल्या चौकशीचा अहवाल पालिका आयुक्त अजोय मेहता यांना मंगळवारी सादर करण्यात आला. यामध्ये विविध 17 मुद्यांवर समितेने प्रकाश टाकला आहे.आग लागल्यानंतर ती शमवण्यासाठी इमारतीमध्ये अंतर्गत अग्निशमन यंत्रणा बसवलेली नव्हती. मोक्याच्या ठिकाणीदेखील ही यंत्रणा बसवली नव्हती. या इमारतीच्या पाय्रयांवर व वाहनांच्या पार्ंकग क्षेत्रात भंगार सामान व अन्य साहित्याचा साठा करुन ठेवण्यात आला होता. प्रत्येक मजल्यावरील वीजपुरवठा यंत्रणा सीलबंद नव्हती.प्रत्येक मजल्यावरील घरांचे दरवाजे अर्ध्या तासाच्या आगीतही जळणार नाहीत एवढया क्षमतेचे नव्हते. आगीच्या घटनेप्रसंगी रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेता येईल, यासाठी ‘रिफ्यूज एरिया’आढळला नाही. तसेच इमारतीच्या गच्चीचे दोन दरवाजे बंद होते. यामुळे गच्चीवरुन सुटकेचा मार्ग बंद होता, असेही चौकशी अहवालात म्हटले आहे.

तोपर्यंत राहण्याची परवानगी देऊ नका

जोपर्यंत संबंधित विकासक अग्निशमनाच्या दृष्टीने ‘एनओसी’ घेत नाही तोवर इमारत प्रस्ताव विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी राहण्याची अनुमती देऊ नये, असेही अग्निशमन दलाच्या अहवालात म्हटले आहे. या आगीत शुभदा शिर्के (62), हसन शेख (36), अशोक संपत (61) आणि संजीव नायर (27) या चौघांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. तर अग्निशमन दलाच्या 5 जवांनांसह 23 जण जखमी झाले होते.