Bridge collapse ‘हिमालय’ पूल दुर्घटनेप्रकरणी हायकोर्टात याचिका

himalay-bridge

सामना ऑनलाईन, मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाबाहेर गुरुवारी फुटओव्हर ब्रिज कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. प्रदीप भालेकर यांच्या वतीने अॅड. नितीन सातपुते यांनी ही याचिका दाखल केली असून या याचिकेवर न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर 22 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

सीएसएमटी स्थानकात गुरुवारी सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत सहा जणांचा नाहक बळी गेला असून 31 जण जखमी झाले आहेत. एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मुंबईतील सर्व पादचारी पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. त्यासाठी समिती स्थापन करण्यात यावी असेही याचिकेत नमूद करण्यात आले होते.

एखादा अपघात घडल्यास हा पूल कोणाचा असा वाद न घालता रेल्वे प्रशासन आणि पालिकेने एकत्रित काम करावे. असे असतानाही गुरुवारी झालेल्या दुर्घटनेत रेल्वे व पालिका एकमेकांवर जबाबदारी ढकलत होते असे त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. हायकोर्टाने ही याचिका स्वीकारत सुनावणी 22 मार्चपर्यंत तहकूब केली.