सीएसएमटी-दादर लोकलसेवा सुरू

सामना ऑनलाईन । मुंबई

रविवारी सकाळपासून बंद असलेली सीएसएमटी-दादर लोकलसेवा सुरू झाली आहे. लष्करामार्फत उभारण्यात येणाऱ्या तीन पुलांपैकी शेवटच्या करी रोड स्थानकातील पुलाच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला होता. लष्कराकडून नवीन पादचारी पुलाच्या गर्डरच्या उभारणीचं काम आज करण्यात आलं. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दादर लोकलसेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती.

मध्य रेल्वेची वाहतूक सकाळपासून दादर आणि कुर्ला स्थानकापर्यंत सुरू होती. लोकल गाड्या पुन्हा तेथूनच ठाणे, कल्याणच्या दिशेने सोडण्यात येत होत्या. त्यामुळे मुंबईकरांना दादरहून सीएसएमटीकडे जाण्यासाठी वाहतुकीचे अन्य पर्याय निवडावेत, असे आवाहन रेल्वेनं केलं होतं. प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टतर्फे ज्यादा बस देखील सोडण्यात आल्या होत्या.