लोकसंस्कृती

डॉ. गणेश चंदनशिवे

ज्ञानदेवे रचिला पाया

सोमवारी ज्ञानेश्वरी जयंती आहे. लोकसंस्कृतीमधून लोकप्रबोधन हाच ज्ञानेश्वरीचा पाया आहे.

श्रवणाच्या मिषें बैसावे येऊनी

साम्राज्य भुवनीं सुखी नांदे

नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी

एक तरी ओवी अनुभवावी

भागवत धर्माचा पाया घालण्याचे काम माऊली महावैश्णव संत ज्ञानेश्वरांनी केलेले आहे. ‘‘ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया’’ याप्रमाणे वारकरी संप्रदायाचा पाया घालण्याचे काम, अध्यात्मिक उद्बोधन आणि समाज प्रबोधनाचे कार्य संत ज्ञानदेवांनी सुरू केल्याची प्रचिती येते. संत ज्ञानेश्वरांच्या कार्याचा गौरव त्यांच्यानंतरच्या संत मांदियाळीतील अनेक संतांनी केलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवन चरित्रावर त्यांच्या कार्याचा उल्लेख करणाऱया अनेक अभंग रचना त्यांच्यानंतरच्या अनेक संतांनी केल्या. यावरून वारकरी संप्रदायाच्या उभारणीतील मूळ पाया संत ज्ञानेश्वर असल्याचे दिसून येते.

जनतेचा उद्धार व्हावा, सकळ जनांनी शहाणे व्हावे, जे आपल्याला अनुभवायला मिळाले त्याचा लाभ इतरांना घेता यावा या सात्विक विचारातून ज्ञानेश्वरीची रचना झालेली दिसते. भगवतगीतेची प्राकृत भाषेत केलेली टीका म्हणजेच ज्ञानेश्वरी. ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीला गीता अलंकार असे म्हटले आहे ते अगदीच सार्थ ठरते. अद्वैतनिष्ठ कर्मप्रधान भक्तीयोगाचे अधिकारी केवळ विशिष्ट जातीजमातीमधील लोकांनाच होता येते असे नाही तर सर्वसामान्य माणसाला, शुद्रांना तळागाळातील माणसालाही तो अधिकार आहे असा आत्मविश्वास ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीमधून मांडला आणि तेराव्या शतकात एक परिवर्तन घडून आले.

 ‘अभंगवाणी’ आणि ‘लोकसाहित्य’ यावर आधारित वारकरी संतांनी रचना केलेली आहे. त्यामुळे अभंगवाणी आणि लोकसाहित्याचे जिव्हाळ्याचे नाते आहे. मराठी मनाच्या संवेदनशीलतेवर संत काव्यातील अध्यात्म, भक्ती आणि नीती यांचा फारच मोठा प्रभाव पडलेला आजही दिसून येतो. ज्ञानेश्वरीतील संतकाव्याचा सखोल ठसा मराठी भाषा, साहित्य, समाज आणि संस्कृती यावर उमटलेला आहे.

ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी ही नित्यनूतन सौंदर्याची आणि सामर्थ्याची रूपे आहेत. संस्कृती, समार्थ्य आणि सारस्वताचा हा मानस्तंभ आहे. ज्ञानेश्वरीतून माउलींच्या व्यक्तिमत्त्वाचे सौंदर्यशाली दर्शन घडते. ज्ञानेश्वर माउलींची ओसंडून वाहणारी प्रसन्न वाणी हा ज्ञानेश्वरीच्या ‘सौंदर्याचा’  एक महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यांच्या मधुरवाणीने आपला विषय त्यांनी कलात्मकतेने या ग्रंथात फुलविला आहे. संतही याला साक्ष देतात. बहिणाबाई भावर्थदीपिकेतील आरतीत म्हणतात, ‘ज्ञानेश्वरीतील अक्षरे ही फक्त अक्षरे नसून जीवात्म्याला मिठी देण्यासाठी आसुसलेल्या आणि त्यासाठी झेपावलेल्या त्या जणु निर्गुणाच्या भुजा आहेत.’

पौराणिक कथा, दृष्टांतकथा, चरित्रकथा, निसर्गकथा, प्राणीकथा, लोककथा असे विविध कथांच्या विषयांचा ज्ञानेश्वरीत निरुपणासाठी, विवरणासाठी, अनुवादासाठी आधार घेतला आहे. रामायण, महाभारत, भागवत, कथाकल्पतरु, शीवलीलामृत, पंचतंत्र अशा लोकसाहित्यातून कथा  ज्ञानदेवांनी निवडून त्या योग्य जागी पेरलेल्या आहेत. ज्ञानेश्वरीतील १२० ओव्यांमध्ये ११७ कथाबीजे मिळाली आहेत.

लोकसंग्रहकारी

ज्ञानेश्वरीतील संतांसंबंधीचे विचार, संतांची लक्षणे, आचारधर्म मांडला आहे. संत हे लोकसंहग्रहकारी म्हणजे लोकांना सन्मार्गाला लावणारे सत्पुरुष असतात. ज्ञानदेवांनी सांगितलेली संताची ही भूमिका ‘मार्गी अंधासरिसा। पुढां देखणाही चाले जैसा।।’’ या न्यायाने संत हे मार्गदर्शक, दिशादर्शक कसे आहेत, याविषयी ज्ञानेश्वर सांगतात.

उच्च नैतिक मूल्यांचे अधिष्ठान

ज्ञानदेवांनी आपल्या साहित्याच्या आधारे धर्माला उच्च नैतिक मूल्यांचे अधिष्ठान प्राप्त करून दिले. निर्बुद्ध आणि निर्जिव कर्मकांडाचा त्यांनी स्पष्ट शब्दात निषेध केला आहे. ज्ञानेश्वरी हा अलौकिक ग्रंथ लिहून तत्त्वज्ञानाबरोबर भक्तीचाही अलौकीक मंत्र दिला आहे.