लोकसंस्कृती

डॉ. गणेश चंदनशिवे,[email protected]

रस्तोरस्ती दिसणारी, पाठीवर आसुड ओढणारी कडकलक्ष्मी लोककलेचे एक उग्र रूप…

लोकरंगभूमीवर घराण्याचा कुळाचार म्हणून ‘गोंधळ’, ‘जागरण’ हे विधिनाटय़ उपासनेचा एक भाग म्हणून सादर करण्याची परंपरा अतिप्राचिन असून तिची पाळेमुळे अति खोलवर रोवलेली आहेत. गोंधळ, जागरण, भारुड इत्यादीचे कार्यक्रम रात्रभर विधी म्हणून उपचारांसह चालत असतात. हे विधी सादर करणाऱया भक्तांना उपासक किंवा लोकपुरोहित म्हणून महाराष्ट्रात ओळखतात. साडेतीन शक्तिपीठांतील शक्तिदेवतांची उपासना करणाऱया या उपासकांना अराक्षी, गोंधळी, भुते, जोगती किंवा कडकलक्ष्मी म्हणतात. हे उपासक, ज्यांच्या घराण्याचे कुलदैवत मात्र लक्ष्मी असेल असे सर्वच लोक समाजातील लोक आईच्या आराधनेसाठी भक्तिभावे उपासना करीत असतात. गोंधळी देवीची विधिवत पूजा करून गोंधळ साजरा करतात, तर अराठी देवीचा पाऊड म्हणून अंगावर कवडय़ांचा अंगरखा घालून आराधना करीत असतात. भुते पोतराज यांच्या अंगावर चोळी, कमरेचा नऊ खणाचा झगारा, केस वाढवलेले, कपाळाला हळदीकुंकवाचा भला मोठा आडवा  मळवट भरलेला, पायात घुंगराचा तोडा बांधून देवीचे स्तुतिपर गीत म्हणतात.

डोंबारी नृत्य हे रंजकप्रधान नृत्यप्रकारात मोडतं. महाराष्ट्र आणि कर्नाटकात आढळणा-या कोल्हाटी या भटक्या जातीचं प्रतिनिधित्व करणारी ही लोककला कसरतींसह सादर होणाऱया नृत्यासाठी ओळखली जाते. काही माकडचाळे केले की रस्त्यावरची माणसं कुतूहलानं पाहत खिशातली नाणी पदरात टाकतात. या पैशातूनच कसंबसं दोन वेळंच खाणं निभावून नेणा-या कोल्हाटी जमातीनं ही कला नावारूपाला आणली.

भुत्ये किंवा पोतराज हातात पोत घेऊन देवीची आराधना करतो. पोतराजाप्रमाणेच देवीची आणखी आराधना करणारे उपासक ते म्हणजे जोगती किंवा जोगतिणी. जोगती यल्लमाचे भक्त असून ते चौडंडके हे वाद्य वाजवून सौंदतीच्या देवीची विधिवत पूजा करतात. ज्याच्या घराण्यात पहिला मुलगा किंवा मुलगी ही देवी यल्लमाच्या आशीर्वादाने नवस करून झाली ते अपत्य देवीला अर्पण करतात. ते मूल जोगता म्हणून देवीचा जग डोक्यावर घेऊन घरोघरी जोगवा मागत फिरतात तेव्हा देवीच्या उपासनेपोटी ते स्फुटपदे म्हणतात.

अशा पद्धतीची साडेतीन शक्तिपीठांत देवीची आराधना उपासकांमार्फत केली जाते. यांच्यातील एक उपासक तो म्हणजे ‘कडकलक्ष्मी’. कडकलक्ष्मी डोंबारी कोल्हाटी जमातीची असतात. हातात पोत म्हणजेच आसुड घेऊन एका ढोलावर गुबू गुबू आवाज करत अंगावर आसुडाचे फटके ओढत देवीची आराधना करतात. लक्ष्मी तशी विष्णूची पत्नी. तिचेच दुसरे रूप म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई. यात अंधश्रद्धा जरी भरलेली असली तरी भक्तिभाव ओतप्रोत भरलेला दिसतो.