नोटांमुळे टीबी आणि अल्सरचा धोका, व्यापारी संघटनांची उपाययोजनांची मागणी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

चलनी नोटांच्या वापराबाबत हिंदुस्थानी नागरिक फार निष्काळजीपणा करीत आहेत. त्यामुळे नोटांना विषाणूंची बाधा होऊन टीबी आणि अल्सरबरोबरच साथीचे आजार होत आहेत. या प्रकाराची तत्काळ दखल घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी विनंती व्यापारी संघटनांनी अर्थमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

काही महिन्यांपूर्वी शास्त्रज्ञांनी नोटांचा अभ्यास करून काही निष्कर्ष काढले होते. किराणा दुकाने, विक्रेते, फेरीवाले अशा ठिकाणच्या नोटांचा हा अहवाल होता. या नोटांवर अनेक रोगजंतूंचे डीएनए शास्त्रज्ञांना आढळले. त्यांच्यामुळे लघवी आणि श्वसनाच्या आजारांचा संसर्ग, त्वचाविकाराचा संसर्ग, आतडय़ांचा आजार, सेप्टीसेमिया, मेनीन्जायटीस होऊ शकतो. ही माहिती द कॉन्फेडेरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) या व्यापारी संघटनेने केंद्रीय मंत्र्यांपर्यंत पत्राच्या माध्यमातून पोचवली आहे. व्यापारी संघटनेने आरोग्यमंत्री डॉ. जे. पी. नड्डा आणि विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनाही पत्र लिहून अधिक तपासाची मागणी केली आहे. ‘सायन्स जर्नल’मध्ये चिंताजनक माहिती वर्षभरापासून प्रकाशित होत आहे.

व्यापारी वर्ग मोठय़ा प्रमाणात नोटा हाताळत असतो. शास्त्रज्ञांच्या नोटांच्या अहवालाबाबत जर तथ्य असेल तर नोटांमुळे केवळ व्यापाऱ्यांच्याच नव्हे तर ग्राहकांच्याही जिवाला मोठा धोका आहे. केवळ सरकारच नव्हे तर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी पुढे येऊन नोटा किती प्रमाणात दूषित झाल्या आहेत याची माहिती द्यावी.
-प्रवीण खांडेलवाल, सरचिटणीस, सीएआयटी

summary- currency notes are causing various diseases