करीरोडचा पादचारी पूल गोदरेज मैदानात उतरवल्यास तीव्र आंदोलन; शिवसेनेचा इशारा

सामना प्रतिनिधी । मुंबई

एल्फिन्स्टन रोड पादचारी पुलावरील दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन संरक्षण विभागाच्या मदतीने एल्फिन्स्टन आणि करी रोड येथे पादचारी पूल तयार करणार आहे. परंतु करीरोड येथील पादचारी पूल गोदरेज मैदानात उतरवण्यात येणार आहे. याला स्थानिकांचा प्रचंड विरोध असून असे झाल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.

याप्रकरणी करीरोडच्या स्थानिक जनतेने सह्यांची मोहीम राबवून याला तीव्र विरोध दर्शवला. करीरोडवासीयांची भावना लक्षात घेऊन शिवसेना उपनेते खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, उपविभागप्रमुख आणि रेल्वे समिती सदस्य गजानन चव्हाण यांनी सर्व अधिकाऱ्यांना गोदरेज मैदानात पाहणीसाठीही बोलावले होते. यावेळी शिवसेना उपविभागप्रमुख आणि रेल्वे कमिटी सदस्य पराग चव्हाण, नगरसेविका सिंधू मसुरकर ,विभाग संघटक लता रहाटे, शाखाप्रमुख अनिल गावकर, महिला शाखा संघटक भारती पेडणेकर, युवा सेनेचे विभाग अधिकारी शार्दुल म्हाडगूत आदी उपस्थित होते.

पादचारी पूल गॅस कंपनी लेनमध्ये उतरवा
करी रोड येथील पादचारी पूल गॅस कंपनी लेन येथे उतरवावा. जेणेकरून लालबागवासीयांनादेखील याचा फायदा होईल, असे खासदार अरविंद सावंत यांनी रेल्वेचे अधिकारी आणि संरक्षण दलाचे अधिकारी यांना सांगितले.