पाकिस्तानच्या बँकांवर सायबर दरोडा

1

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

पाकिस्तानातील बँकांवर सायबर दरोडा पडला असून हॅकर्सच्या टोळीने हजारो कोटी रुपये पळवले आहेत. दरोडेखोरांनी देशभरातील हजारो बँकांतील खातेदारांची खाती रिकामी केल्याचे सायबर सुरक्षा यंत्रणेने कबूल केले आहे.

पाकिस्तानच्या सायबर सुरक्षा तपास यंत्रणेचे प्रमुख मोहम्मद शोएब यांनी बँकांवर पडलेल्या सायबर दरोडय़ाची स्पष्ट कबुली दिली आहे. आतापर्यंत 100 पेक्षा जास्त प्रकरणांची चौकशी करण्यात आली असून काही सायबर दरोडेखोरांना जेरबंद करण्यात आल्याचे शोएब यांनी सांगितले. या दरोडेखोरांकडून रक्कमही वसूल करण्यात आल्याचे ते म्हणाले. मात्र देशभरातील मोठमोठय़ा बँकांमधील खातेदारांचे खातेच या दरोडेखोरांनी रिकामे केले आहेत. हजारो खातेदार असल्यामुळे चौकशी कशी करावी असा प्रश्न आमच्यासमोर आहे असे शोएब म्हणाले. बँकांच्या व्यवस्थापनाशी चर्चा करण्यात येत असून त्यांच्याकडून व्यवस्थित डाटा मिळाल्यानंतर पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. इस्लामी बँकेवर 27 ऑक्टोबर रोजी पहिला सायबर दरोडा पडला. या बँकेचा डाटा हॅक करून 2.6 कोटी रुपये आंतरराष्ट्रीय पेमेंट कार्डच्या माध्यमातून लुटण्यात आले. इस्लामी बँकेप्रमाणेच इतर महत्त्वाच्या बँकांनाही लक्ष्य करण्यात आले. सायबर दरोडा पडल्यानंतर पाकिस्तानातील आर्थिक व्यवहार काही काळ थांबवण्यात आले.