वेब न्यूज : पुन्हा एकदा डाटा चोरीला

80

स्पायडरमॅन

गेल्या वर्षी संपूर्ण सायबर विश्वालाच डाटा लीक अर्थात माहितीच्या चोरीचा जबरदस्त फटका बसला होता. फेसबुक, गुगलसारख्या कंपन्या तर या चोरीत सहभागी असल्याचा आणि त्यांनी ती माहिती विकल्याचा आरोपदेखील झाला. जगभरात फेसबुकला अनेक खटल्यांना सामोरे तर जावे लागतच आहे, पण दंडदेखील भरावा लागत आहे. हे सगळे कमी की काय म्हणून या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वात मोठे डाटा लीकचे प्रकरण समोर आले आहे. ट्रॉय हंट (troyhunt.com) या रिसर्च कंपनीने याचा खुलासा केला आहे. इंटरनेटच्या विविध माध्यमांतून जगभरातील 77.3 करोड ई मेल आयडी आणि 2.1 कोटी पासवर्ड  हॅक करण्यात आले आहेत. हा सगळा डाटाबेसच ट्रॉय हंटने इंटरनेटवर खुला केला आहे. हा संपूर्ण डेटाबेस ट्रॉय हंटने www.haveibeenpwned.com वर जाहीर केला आहे. कोणीही युजर www.haveibeenpwned.com वर जाऊन आपला ई मेल आयडी हॅक झाला आहे की नाही हे तपासू शकेल. इथे दिलेल्या चौकोनात आपला ई मेल आयडी टाकल्यानंतर जर ‘गुड न्यूज’ लिहून आले तर त्याचा अर्थ तुम्ही सुरक्षित आहात. मात्र जर ‘Oh no-Pwned’ असे लिहून आले तर तुमचा ई मेल आयडी हॅक झाला आहे. त्याचा पासवर्ड लगेच बदलून टाका आणि आपले ई मेल खाते सुरक्षित करा. ट्रॉय हंटने सांगितले की, काही दिवसांपूर्वी अनेक लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि MEGA या प्रसिद्ध क्लाऊड सर्व्हिसेसवर असलेल्या एका मोठय़ा फाइल कलेक्शनची माहिती दिली. जवळपास 12 हजार विविध फायलींचे असे हे कलेक्शन असून त्या सगळ्यांची मिळून एकत्रित साईज 87 जीबी एवढी प्रचंड आहे. हे एकूण 2,69,28,18,238 एवढय़ा ई मेल आणि पासवर्डचे कलेक्शन आहे. त्यांनी स्वतःदेखील तिथला डाटा तपासला आणि त्यात स्वतःचा पर्सनल डाटादेखील चोरीला गेल्याचे आणि या कलेक्शनमध्ये असल्याचे दिसून आले. अर्थात तो पासवर्ड बराच जुना आणि वापरात नसलेला होता असे ट्रॉयने स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या