इंटरनेटच्या माध्यमातून होते अशी ही बनवाबनवी

प्रातिनिधीक फोटो

इंटरनेटच्या माध्यमातून फसवणुकीच्या अनेक घटना जगभरात घडत असतात. या गुह्यांमधले आरोपी कधी सापडतात, तर कधी जंग जंग पछाडूनदेखील त्यांचा पत्ता लागत नाही. हे इंटरनेटच्या जाळ्यात गळ टाकून बसलेले गुन्हेगार कधी कधी अशा काही युक्त्या वापरतात की, आपण थक्कच होऊन जातो. अशीच एक घटना नुकतीच चीनमध्ये घडली. चीनवाले जगभरातील लोकांना टोप्या घालतात असे म्हटले जाते, पण कधी कधी ते आपल्याच देशातल्यांना टोप्या घालतात ते बघणे जास्ती मनोरंजक असते. शायली ही अशीच एक चीनमधली कॉलेज कन्या. आईवडील दोघेही वृद्ध आणि त्यात शायलीला नवीन घर घेण्याची अतिशय निकड उभी राहिली. हलाखीची परिस्थिती असलेल्या शायलीने मग आपली बुद्धी वापरली आणि २० बॉयफ्रेंड पटवले. नुसते पटवलेच नाहीत, तर त्या प्रत्येकाला भुरळ पाडून त्यांच्याकडून एक-एक आयफोन-७ सुद्धा भेट म्हणून मिळवले. असे एकूण वीस जमा झालेले फोन या कन्येने एका मोबाईल रिसायकलिंग प्लॅण्टला $१७, ८१५ म्हणजेच साधारण १२, २३, ५००  रुपयांत विकूनदेखील टाकले. आलेल्या पैशांतून आता तिने एक छानसे घर खरेदी केले आहे आणि ती तिथे शिफ्टदेखील झाली आहे.  दुसरीकडे आपल्या हिंदुस्थानात गुरुग्राममध्ये ६६ वर्षांच्या एका निवृत्त बँक कर्मचाऱ्याला जेनी ऍण्डरसन नावाच्या आयडी कडून ३५ लाख रुपयांना फसवण्यात आले आहे. आपण लंडनच्या रहिवासी असून स्वतःच्या मालकीचा दागिन्यांचा मोठा व्यवसाय तसेच दुकान असल्याचेदेखील तिने सांगितले होते. व्यापाराच्या संदर्भात आपण हिंदुस्थानसह अनेक देशांमध्ये ये-जा करत असतो असे तिने या निवृत्त कर्मचाऱ्याला सांगितले होते. पुढे पुढे या दोघांमध्ये फोन नंबरची देवाणघेवाण होऊन व्हॉटस्ऍपवर गप्पादेखील सुरू झाल्या. आपल्या बोलण्याने भुरळ घालत तिने एक दिवशी या साहेबांना आपल्या खात्यात १३ लाख रुपये भरायला लावले आणि नंतर हिंदुस्थानच्या विमानतळावर इमिग्रेशनमध्ये अटक झाल्याचे भासवत दंडाची रक्कम २२ लाखदेखील भरायला लावली. आता या महिलेशी कुठलाच संपर्क होत नसल्याने तिच्याविरुद्ध त्यांनी तक्रार दाखल केली आहे.