सायबोर्गच्या दिशेने

2

एलोन मस्क हा माणूस तंत्रज्ञानाच्या विश्वात तसा एकदम लोकप्रिय. त्याच्या भन्नाट कल्पना बऱ्याचदा अवास्तव वाटत असल्या तरी तंत्रज्ञान क्षेत्रातील त्याची कामगिरी जबरदस्त आहे. पे-पालसारखी डिजिटल पेमेंट कंपनी असो किंवा ई-वाहन बनवणारी टेस्ला कंपनी किंवा हायपरलूप, प्रोजेक्ट-एक्ससारख्या संकल्पना असोत. या प्रत्येक ठिकाणी एलोन मस्कने आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवून दिली आहे. आता हा माणूस ‘न्यूरोलिंक’ या आपल्या नव्या कंपनीच्या मदतीने अर्धे यंत्र आणि अर्धा मानव अर्थात सायबोर्गच्या निर्मितीच्या प्रयत्नात आहे. या प्रयोगात संगणकाला थेट मेंदूशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मेंदूत इलेक्ट्रोड टाकून विविध विचारांना डाऊनलोड अथवा अपलोड करणे शक्य होईल का याची चाचपणी केली जाणार आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचे हे क्षेत्र सध्या भन्नाट प्रयोगांना जन्म देत आहे हे मात्र नक्की. ‘न्यूरोलिंक’च्या या अफाट प्रयोगाकडे सर्वच क्षेत्रांतील तज्ञांचे लक्ष लागून राहिलेले आहे.