नवे वर्ष, नवे संकल्प…

दा. कृ. सोमण, पंचागकर्ते

२०१८ वेशीवर उभे आहे. अजून एक नवे वर्ष. पाहूया नव्या वर्षातील जागरूक संकल्प.

सोमवारपासून नवीन वर्ष इसवी सन २०१८चा प्रारंभ होत आहे. १ जानेवारी २०१८ पासून सुरू होणाऱया वर्षात काय घडणार आहे हे आपणांस माहीत नाही. मात्र आपण या नवीन वर्षात काय काय करणार आहोत ते मात्र ठरवू शकतो. इतरांनी कसे वागावे हे आपल्या हातात नसते, पण आपण कसे वागायचे ते मात्र आपल्याच हातात असते. जे आपल्या हातात आहे, जे आपण करू शकतो अशा कामांचा संकल्प करावा, त्याप्रमाणे वागावे. मागील काळात झालेल्या चुका परत हातून होणार नाहीत यासाठी आपण जास्त काळजी घेऊ शकतो. या जगात जी यशस्वी झालेली माणसे आहेत त्यांचे जीवन आपण अभ्यासले तर लक्षात येते की, अशी माणसे अडचणीतही संधी शोधणारी असतात आणि अयशस्वी झालेली माणसे संधी आली असता अडचणी सांगत बसणारी असतात. या नूतन वर्षात आपण अडचणीतही संधींचा शोध घेऊया. आनंदाच्या क्षणांची आपण वाट पाहत राहिलो तर कायमच वाट पाहत राहू, परंतु मिळालेला प्रत्येक क्षण जर आपण आनंदात घालविला तर कायमचे आनंदात राहू.

या नूतन वर्षात करावयाच्या पंधरा गोष्टी आपण लक्षात ठेवूया. मनाशी संकल्प करून तसे वागण्याचा प्रयत्न करूया.

> आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊया. यापुढे आजारी पडणे कुणालाही परवडणारे नाही. मग त्यासाठी रोज सकाळी खंड न पडता आपण ‘मार्ंनग वॉक’ घेऊया. आहाराकडे नीट लक्ष देऊया. व्यायाम करूया. निर्व्यसनी राहूया.

> आपण आपला चेहरा कसा ठेवायचा हे आपल्याच हातात असते. या नूतन वर्षात आपण आपला चेहरा नेहमी हसरा ठेवूया. इतर प्राणी हसू शकत नाहीत. हसण्याची गोष्ट निसर्गाने फक्त मानवाला दिली आहे. आपण आपला चेहरा नेहमी हसरा ठेवला तर इतरांना आनंद होत असतो. स्माईल करताना आपण खूप सुंदर दिसत असतो. रडवा, चिंताग्रस्त चेहरा कुरूप दिसतो.

> इतरांचे शांतपणे ऐकण्याची आपण सवय लावून घेऊया. याचा आयुष्यात पुढे खूप फायदा होत असतो.

> या नूतन वर्षात आपण इतर सर्वांशी नीट बोलूया. बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोलूया. या सवयीचा पुढे आयुष्यात खूप उपयोग होतो.

> आपल्या हातून एखादी चूक झाली तर ती न लपवता चूक कबूल करूया. आपण जर खुल्या मनाने चूक कबूल केली तर इतरांचा आपल्याविषयी त्यांचा चांगला समज होत असतो.

> नेहमी जवळ छोटी डायरी ठेवूया. कधी कधी प्रवासात आपण एखादे चांगले वाक्य, चांगला विचार ऐकतो. तो आपल्या लक्षात राहत नाही. म्हणून तो विचार आपण लिहून ठेवूया.

> मोबाईल फोनचा वापर संयमाने, अगदी जरुरीपुरता करूया. व्हॉटस्ऍप, फेसबुक यांचा वापरही आपण संयमाने करूया.

> कोणताही निर्णय घेताना आपण भावनेच्या आहारी जाऊन नको घेऊया. भावनेवर बुद्धीचे नियंत्रण ठेवूया.

> चांगल्या मित्रांची संगत ठेवूया.

> आपल्या हातून प्रदूषण होणार नाही याची काळजी घेऊया. पर्यावरणाकडे लक्ष देऊन निसर्गाला जपूया.

> फुकट गोष्टी घेण्यापासून आपण दूर राहूया. कोणतीही गोष्ट मग ती निसर्गातीलसुद्धा फुकट निर्माण होत नसते. प्रत्येक गोष्टीच्या मागे कुणाचे तरी श्रम, पैसा आणि वेळ हा खर्च झालेला असतोच. प्रत्येक गोष्ट आपण मोबदला देऊनच घेऊया.

> आपण आपले आर्थिक नियोजन करूया. कर्जाची फेड करता येत नसेल तर कर्ज काढण्यास आपण पात्र नसतो.

> दुसरा आपल्याशी वाईट वागला तरी आपण आपला चांगलेपणा टिकवून धरूया.

> परिणामांचा विचार करून कृती करूया. कोणतेही काम नीट ‘लक्ष’ देऊन केले तर  ‘लक्ष्य’ गाठणे सुलभ असते.

> या जगात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे  ‘वेळ’! आपल्या आयुष्यातील गेलेला क्षण परत मिळत नाही. म्हणून दररोज वेळेचे व्यवस्थापन करायला शिकूया.

> आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊया, इतरांना मदत करूया.

आपण जर या पंधरा गोष्टींचा मनाशी संकल्प करून नूतन वर्षारंभापासून वागलो तर आपले जीवन समृद्ध होण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल. मित्रांनो, मी याप्रमाणे संकल्प केला आहे. मग तुम्ही संकल्प करणार ना? तुमच्या संकल्पपूर्तीसाठी माझ्या शुभेच्छा!